Join us
Daily Top 2Weekly Top 5

"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:19 IST

'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर देखील 'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. एक नवी कोरी कथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

मराठी मालिकांचं शीर्षकगीत हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. अनेक जुन्या आणि गाजलेल्या मालिकांचे शीर्षकगीत आजही तितक्याच आवडीने प्रेक्षक ऐकतात. 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेचं शीर्षकगीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. "थोडं हसवतं थोडं रडवतं नातं हे नवसाचं...थोडं तुझं आणि थोडं माझं", असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे बोल आहेत. हे शीर्षकगीत वैभव जोशी यांनी लिहिलं आहे. तर आर्या आंबेकर आणि नचिकेत लेले यांनी या गीताला आवाज दिला आहे. अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी यांनी या शीर्षकगीताला संगीत दिलं आहे. 

दरम्यान, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहेत. शिवानी या मालिकेत मानसी हे पात्र साकारताना दिसणार आहे. तर समीर तेजस प्रभूच्या भूमिकेत आहे. या मालिकेत मानसी कुलकर्णीही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १७ जूनपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाहशिवानी सुर्वेआर्या आंबेकरटिव्ही कलाकार