Join us

'वकिलाची मुलगी शोभतेस खरी...!', हेमांगी कवीने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 20:24 IST

Hemangi Kavi : हेमांगी कवी सध्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत पाहायला मिळते आहे.

उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (Hemangi Kavi). हेमांगी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेत पाहायला मिळते आहे. नुकतेच या मालिकेतील भागाबद्दल तिने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. 

हेमांगी कवी हिने मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. यात ती वकिलीच्या भूमिकेत दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, कोर्टात भेटू! माझे बाबा एलएलबी(वकिल) होते पण घरच्या परिस्थितीमुळे प्रॅक्टिसन करता त्यांना नोकरी धरावी लागली. पण त्यांचा हा वकिलीचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आणला किंवा असं म्हणूया तो नकळतपणे येत होता. कंपनीच्या संपाच्या वेळेस, कंपनीच्या युनियनमध्ये, कधी कधी तर वैयक्तिक समस्या घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे कायदेशीर सल्ले मागायला यायचे आणि माझे ‘पप्पा’ जणू त्यांच्याकडे आलेल्या एखाद्या प्रोफेशनल केससारखी त्यांच्या मित्रांना, कामगारांना, ओळखीच्या लोकांना विना मुल्य मदत करायचे. त्यावर माझी ‘मम्मी’ टिपिकल बायको सारखी कायम बोलायची, “या मदतीचे किमान पैसे तरी घ्या, का उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” त्यावर ते वकिली उत्तर देत म्हणायचे “वकिलीची शपथ घेतली नाही तर मी कुणाकडून पैसे कसे घेणार? मी जर असे पैसे घेतले तर माझ्यावरच केस होईल. नाही का?” त्यावर बिच्चारी माझी मम्मी केसमध्ये हरलेल्या क्लायंटसारखी गप्प व्हायची.

ती पुढे म्हणाली की, आम्ही भावंडं भांडायला लागलो की माझं मुद्देसुद बोलणं ऐकून माझी आई नेहमी म्हणायची इतकेच नाही तर अजूनही म्हणते वकिलाची मुलगी शोभतेस खरी! सध्या मी स्टार प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारतेय. माझ्या बाबांनी कधीच आमच्यावर त्यांचा वकिलीचा वारसा जपण्याची इच्छा लादली नाही! उलट आम्हांला जे आवडेल, झेपेल तेच शिकू दिलं! आवडतं क्षेत्र निवडू दिलं! पण आज मला असं वकिलाच्या बॅण्ड आणि गाउनमध्ये पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला असता हे नक्की! माझ्या अभिनयाच्या करिअरचा महत्त्वाचा खांब असणाऱ्या माझ्या ‘पप्पांना’ माझ्या सर्व भूमिका समर्पित आहेतच पण अॅडव्होकेट गायत्री वर्तक ही भूमिका खास तुमच्यासाठी पप्पा! 

टॅग्स :हेमांगी कवीस्टार प्रवाह