Join us

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली आणि मधुभाऊंचं बाप-लेकीचं नातं, जुई म्हणाली-माझी इच्छा होती....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 17:56 IST

जुलै २०२२ मध्ये जेव्हा माझं ठरलं तर मग मालिकेसाठी कास्टिंग झालं तेव्हा मला कळलं की, मामा माझ्या वडिलांची भूमिका करणारेत हे ऐकून मला अतिशय आनंद झाला.

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून सायलीचा ज्यांनी संभाळ केला त्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायलीचे प्रयत्न सुरु आहेत. मधुभाऊ सायलीचे खरे बाबा नसले तरी लहानपणापासून त्यांनी सायलीला वडिलांच्या मायेने वाढवलं. बाप-लेकीचा हा अनोखा बंध ज्याप्रमाणे मालिकेत पहायला मिळतो तसाच खऱ्या आयुष्यातही. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि मधुभाऊ म्हणजेच नारायण जाधव यांनी स्टार प्रवाहच्या पुढचं पाऊलमध्येही एकत्र काम केलंय. पुढचं पाऊल मध्ये नारायण जाधव यांनी जुईच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. पुढचं पाऊल मालिका जरी संपली तरी जुई आणि नारायण जाधव एकमेकांच्या संपर्कात होते. 

 या अनोख्या बंधाविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘पुढचं पाऊलला नारायण मामांनी माझ्या आजे सासऱ्यांची भूमिका साकारली होती. तेव्हापासून त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची माझी इच्छा होती. मालिका संपली तरी आम्ही इतकी वर्ष संपर्कात होतो. नारायण मामा माझं काम आवडलं तर, पोस्ट आवडली तर स्वतःहून मला मेसेज, फोन करायचे. जुलै २०२२ मध्ये जेव्हा माझं ठरलं तर मग मालिकेसाठी कास्टिंग झालं तेव्हा मला कळलं की, मामा माझ्या वडिलांची भूमिका करणारेत हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. मला त्यांच्यासोबत काम करायला नेहेमीच मज्जा येते. त्यांच्या बद्दल एक आपुलकी वाटते. 

मधुभाऊ आणि सायली यांचे सीन्स करायला मला विशेष आवडतात. त्यांनी “साऊ” अशी हाक मारली कि खूप छान वाटतं. मालिकेत सध्या मधुभाऊंना त्यांनी न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय. सायली मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी झटतेय. विशेष म्हणजे सायलीचे खरे वडील म्हणजे रविराज मधुभाऊंची केस लढणार आहेत. मधुभाऊ निर्दोष सुटणार का? कसा असेल सायली आणि मधुभाऊंच्या नात्याचा पुढील प्रवास? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार