'ठरलं तर मग' मालिकेत सध्या वात्सल्य आश्रम कोर्ट केसचा निकाल आणि त्यानंतरचे नाट्यमय ट्विस्ट्स प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरले आहेत. आश्रममध्ये झालेल्या खूनात साक्षीला जन्मठेपेची तर प्रियाला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. पण, प्रिया जर ७ वर्ष जेलमध्ये गेली, तर मग मालिका कशी पुढे चालणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोन्ही खलनायक जेलमध्ये मग मालिकेत काय होणार? त्यामुळेच आता मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. या चर्चांवर सायलीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीनं पूर्णविराम दिला आहे.
जुई गडकरीने पोस्ट शेअर करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मालिका बघत राहा,अशी विनंती चाहत्यांना केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहलं, "मालिकेत लीप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाहीये. त्यामुळे युट्यूबवरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरवू नका. सोशल मीडिया पेजेसला सुद्धा हीच विनंती आहे की, कृपया अफवा पसरवू नका", असं म्हटलं.
पुढे तिनं लिहलं, "मालिका सुरूच राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळुहळू एक-एक गोष्ट उलगडत जाणार आहे. अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे. फक्त 'वात्सल्य आश्रम' केसचा निकाल लागला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, मालिका रोज बघत राहा. 'ठरलं तर मग' मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कायम कृतज्ञ आहोत", असं तिनं म्हटलं.
आता जुई गडकरीनं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मालिकेचे चाहते खुश झालेत. त्यामुळे मालिकेत आता कोणतं नवं वळण येणार हे पाहायला मजा येणार आहे. 'ठरलं तर मग' ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. चाहते न चुकता ही मालिका रोज पाहतात. सोशल मीडियावर सुद्धा या मालिकेची क्रेझ भरपूर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते.