'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली आणि गाजलेली मालिका. या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी ही चटका लावून जाणारी होती. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. काही दिग्गज अभिनेत्रींची नावंही समोर आली होती. मात्र अद्याप तसं काहीच ठरलं नसल्याचा खुलासा 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्रीने केला आहे.
'ठरलं तर मग' मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारणारी आणि मालिकेची संवाद लेखिका असलेली अभिनेत्री शिल्पा नवलकरने नुकतीच 'फिल्मी मराठी Kmw' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, "सध्या आमची क्रिएटिव्ह टीम याचा विचार करत नाहीये. ज्योतीताई दर महिन्याच्या शेवटी ५ दिवस सुट्टी घ्यायच्या. त्या पुण्याला जायच्या. त्यांची डॉक्टरची अपॉइंमेंट, रेग्युलर चेकअप, त्यांच्या मुलीला त्या भेटायच्या. हे दोन-अडीच वर्षांपासून त्यांचं रुटिन होतं. सलग ५ दिवस त्यांची सुट्टी असायची. त्याप्रमाणे शूट मॅनेज व्हायचं आणि मग परत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यायच्या आणि २५ तारखेपर्यंत शूटिंग करायच्या. तसंच तीन मालिकांचं महासंगमचं शूटिंग पूर्ण करुन त्या गेल्या होत्या. सुचित्राताईशी त्यांचं बोलणं झालं होतं. आणि मग अचानक दुसऱ्या दिवशी कळलं की असं झालं".
"आम्ही अजूनही हे सगळं प्रोसेस करतोय. ज्योतीताई आम्हाला खूप जवळच्या होत्या. खूप जण विचारत आहेत की त्यांच्या जागी कोणाचं कास्टिंग होणार वगैरे. काही अभिनेत्रींची नावंही समोर आली आहेत. पण, खरं सांगायचं तर तसं काहीच ठरलेलं नाहीये. आम्ही सध्या विचारच करत नाही आहोत", असंही शिल्पाने नवलकरने सांगितलं.