'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायम अव्वल असते. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. 'ठरलं तर मग' मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुनची भूमिका साकारत आहे. अर्जुनने नुकतीच एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अर्जुनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अमित भानुशालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अमित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. मालिकेच्या सेटवरील अनेक व्हिडिओदेखील तो त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन चाहत्यांसोबत शेअर करतो. तर वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो देत असतो. नुकतंच अमित भानुशालीने नवी कोरी बुलेट घरी आणली आहे. अमितने रॉयल एनफिल्ड कंपनीची नवी बाईक खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ त्याने युट्यूबवरुन शेअर केला आहे.
अमितने या व्हिडिओतून त्याच्या बाईकची झलकही दाखवली आहे. पत्नी, मुलगा हृदान आणि आईसह अमित त्याची ही नवीन बाईक खरेदी करण्यासाठी गेला होता. अमितच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, अमितने अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे.