मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) गेल्या दशकभरापासून मनोरंजनविश्वात काम करत आहे. 'होणार सून मी या घरची' मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. 'अगं बाई सासूबाई','प्रेमाची गोष्ट' याही तिच्या मालिका गाजल्या. मालिकेत काम करताना साकारत असलेल्या भूमिकांचा नंतर कसा परिणाम होतो यावर नुकतंच तेजश्रीने भाष्य केलं आहे.
आवाहन या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री म्हणाली, "मी जेव्हा मालिकेचं शूट करते तेव्हा अनेकदा एखादा सीन मनाला भावत नाही. असं कुठे असतं का, असं कोण वागतं? कदाचित आपण शहरात वावरतो म्हणून आपल्याला पटत नसेल. पण प्रत्येक गावातील माणसाची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी मनाला न पटणारी गोष्ट सुद्धा तितक्याच ताकदीने करता येते. आपल्या शहरातील लोकांना पटत नसलं तरी तिथल्या गावातील लोकांना कदाचित ती भावना समजणं महत्वाचं असेल. आज मालिकांमध्ये अभिनेत्री सतत किती सहन करते, तिच्यावर दु:खाचा डोंगर असतो, कसं त्यातून ती जाते हे आपण दाखवतो. छोट्या गावातील बाई हेच पाहून त्यात स्वत:ला शोधत असते. मग तिला असं वाटतं की ही आपली लाडकी अभिनेत्री जर यातून गेली तर आपण का नाही? ही भावना त्यांच्यात निर्माण होते जे महत्वाचं आहे."
तेजश्री प्रधान लवकरच 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतून ती झी मराठीवर कमबॅक करत आहे. यामध्ये तिच्यासोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. दोघांनी 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात काम केलं होतं. आता हीच जोडी मालिकेतून भेटीला येणार आहे.