तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. जान्हवीबरोबरच तेजश्री सध्या साकारत असलेल्या मुक्ता या भूमिकेनेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मात्र आता प्रेक्षकांना मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री दिसणार नाहीये.
'प्रेमाची गोष्ट' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. या मालिकेतील मुक्ता-सागर यांची जोडी प्रेक्षकांना भावली. मालिकेत अभिनेता राज हंचनाळे हा सागर कोळीच्या भूमिकेत आहे. तर मुक्ताची भूमिका तेजश्री साकारत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका दिसते. पण, तेजश्रीने आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली आहे. पण, यामागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
या मालिकेत आता मुक्ताच्या भूमिकेत नवी अभिनेत्री दिसणार आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एन्ट्री घेणार आहे. या मालिकेत ती आता मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, तेजश्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिचा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.