तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली. तेजश्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तेजश्रीने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिली.
या मुलाखतीत तेजश्रीने लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ती म्हणाली, "२५-३० वर्षांपर्यंत मुली चुकीच्या मुलाच्या प्रेमात पडतात. खूप स्मार्ट दिसणारी, ग्रुप का जान असणारी मुलं मुलींना आवडतात. पण, ही मुली फक्त स्वप्नाळू असतात. पण, तुम्हाला खऱ्या आयुष्यात स्थैर्य आणि खात्री देणारा मुलगा हवा असतो". "तिशीच्या आत लग्न करण्यासाठी मुलींवर प्रेशर असतं. पण, करिअर आणि लग्न या दोन्हीवर लक्ष केंद्रित करण्यात कुठेतरी गल्लत होते. याबाबत तुझं काय मत आहे", असा प्रश्न तेजश्रीला विचारण्यात आला.
यावर उत्तर देत तेजश्री म्हणाली, "हा व्यक्तीसाक्षेप प्रश्न आहे. मला लग्न करण्यासाठी आईबाबांनी प्रेशर टाकलं नव्हतं. मला लहानपणापासून आयुष्यात लग्नच करायचं होतं. लहानपणापासून आपण आईकडून ऐकत आलेले असतो, त्यामुळे उत्सुकता असते. मलाही गृहिणी व्हायचं होतं. मला पंचवीशीत लग्न करायचं होतं. आणि मी केलंही. पण, देवाचे माझ्यासाठी काहीतरी वेगळे प्लॅन होते".
"सगळ्यात पहिलं तर ही जेन झी ही संकल्पना मला भयंकर आणि भीतीदायक वाटायला लागली आहे. आपण, रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅगबद्दल बोलायला लागलोय. बेन्चिंग आणि सिच्युएशनशिप यामुळे काहीही फायदा होणार नाहीये. हे फार वाईट आहे. मी आताच्या जनरेशनशिपला सपोर्ट करणारी आहे. पण, तरीही काही गोष्टींवर माझं ठाम मत आहे. आणि त्यातली ही मोठी गोष्ट आहे", असंही तिने पुढे सांगितलं.