'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शो. प्रत्येक घराघरात हा शो पाहिला जातो. मात्र आता हा शो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तारक मेहताचे निर्माते असित मोदींवर मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले आहेत. असित मोदींनी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचं जेनिफरने म्हटलं आहे.
जेनिफरने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने असित मोदींवर गंभीर आरोप करत या सगळ्याचा मानसिक त्रास झाल्याचं म्हटलं आहे. जेनिफरने सांगितलं की या सगळ्याची सुरुवात २०१८मध्ये झाली. जेव्हा मालिकेचे ऑपरेशन हेड असलेल्या सोहेल रमानी यांनी तिला फोनवर शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर तिने प्रोड्युसर असलेल्या असित मोदींना फोन केला. पण, त्यांनी तिला पाठिंबा देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने वर्तन केलं. "तू सेक्सी दिसत आहेस", असं असित मोदी म्हणाल्याचं जेनिफरने सांगितलं.
जेनिफरने नंतर आणखी एका घटनेचा उल्लेख केला. २०२२ मध्ये स्वित्झर्लंड ट्रिपसाठी विझाच्या बाबतीत जेनिफरने असित मोदींना फोन केला होता. तेव्हा तिला रडू कोसळलं. तेव्हा असित मोदी "तू का रडत आहेस? तू इथे असतीस तर मी तुला मिठीत घेतलं असतं. तुला माझी किंमत नाही", असं म्हणाल्याचं जेनिफरने सांगितलं. जेनिफरने २०१९ मध्ये परदेशात शूटिंग करत असताना घडलेला प्रसंगही सांगितला.
ती म्हणाली, "८ मार्च २०१९ रोजी ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले की तुझा रुममेट तर रोज बाहेर जातो. तू माझ्या रुममध्ये येऊन विस्की का पीत नाहीस? तू एकटी बोर होशील. सुरुवातीला मी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. पण, नंतर मला कळायला लागलं की हे गंभीर आहे. सिंगापूरला असतानाच एका कॉफी शॉपमध्ये बसलेलो असताना असित मोदी माझ्या जवळ आले आणि म्हणाले की तुझे ओठ खूप सेक्सी आहेत. असं वाटतंय की तुला पकडून किस करू? तेव्हा मला धक्का बसला होता आणि मी घाबरले".