Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता...' फेम दयाबेनने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, राजाच्या दरबारातून दिशा वकानीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:39 IST

अनेक मराठी, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील दयाबेन म्हणजेच दिशा वकानीनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाच्या दर्शनालाही दरवर्षी अनेक भाविक जात असतात. दरवर्षी सेलिब्रिटीही लालबागचा राजाच्या दर्शनाला जातात. यावर्षी पहिल्या दिवसापासूनच सेलिब्रिटींनी राजाच्या दरबारात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. अनेक मराठी, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील दयाबेन म्हणजेच दिशा वकानीनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 

दिशा वकानी बुधवारी(३ सप्टेंबर) लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती. लालबागचा राजाच्या दरबारातील तिचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिशा वकानी लालबागचा राजाचं दर्शन घेताना दिसत आहे. बाप्पाच्या चरणावर डोकं ठेऊन दिशा वकानीने आशीर्वाद घेतले. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दिशा साडी नेसून पारंपरिक लूकमध्ये आली होती. तिने चेहऱ्याला मास्कही लावला होता. अभिनेत्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, दिशा वकानीचे व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत दिशा तारक मेहतामध्ये कधी दिसणार अशी विचारणा होत आहे. तर काही चाहत्यांनी अभिनेत्रीला दयाबेन म्हणून तारक मेहता का उलटा चष्मामध्ये परतण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :गणेशोत्सवलालबागचा राजादिशा वाकानी