Join us

अशोक मामांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:44 IST

या आठवड्यात अशोक सराफ आणि त्यांच्या सोबत काम केलेले सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत.

कसे आहात मंडळी मजेत ना? आणि हसताय ना? असं आपुलकीने विचारत वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा अविरत आणि सातत्याने भरभरून मनोरंजन करणारी टीम म्हणजे चला हवा येऊ द्या ची. डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके हे सहा अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत आज पर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. या मंचावर प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील हास्याचा डोस अनुभवण्यासाठी सज्ज होतात.

या आठवड्यात अशोक मामा आणि त्यांच्या सोबत काम केलेले सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. निमित्त आहे अशोक मामांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सोहळा. तसंच अशोक सराफ यांचा ४ जून रोजी वाढदिवस देखील असतो आणि या महान विनोदवीराने आपल्या अभिनय क्षेत्रातील अफाट योगदानाने प्रेक्षकांचं ५ दशकं मनोरंजन केलं, त्यामुळे चला हवा येऊ द्या च्या मंचावर हा दिवस सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे.

अशोक मामा यांच्यासोबत त्यांच्या सौ निवेदिता सराफ, आणि त्यांच्यासोबत मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, निशिगंधा वाड या देखील उपस्थित होत्या. यांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी कल्ला केला आणि अशोक मामांच्या चित्रपटावर आधारित एक प्रहसन सादर करून सगळ्यांना लोटपोट केलं.

टॅग्स :अशोक सराफचला हवा येऊ द्या