Join us

"या राज्यात कामचुकारपणा, निर्लज्जपणाचा कळस" सुमीत राघवनचा संताप, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:07 IST

अभिनेत्यानं रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्यकर्त्यांना सुनावलं आहे.

Sumeet Raghavan: अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) हा कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सुमीत राघवन सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्याचं मत मांडत असतो. अनेकदा सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया देतो. अभिनेत्यानं पावसाळी दिवसांमध्ये मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्यकर्त्यांना सुनावलं आहे.

मुळच्या 'मीराभाईंदरकर'  नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरील व्हिडीओ त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, "कामचुकारपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे या राज्यात. सामान्य माणूस कसा जगतोय याच्याशी घंटा काही देणं घेणं नाहीये या लोकप्रतिनिधींना. मी गेली ५ वर्ष रोज जातो मीरा रोडला आणि हे दर वर्षीचं रडगाणं आहे", या शब्दात संताप व्यक्त केलाय. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय? 

या व्हिडीओमध्ये काही माणसं रस्त्यावरील खड्ड्यामध्ये सिमेंट ब्लॉक टाकून तात्पुरत्या स्वरुपात उपाय योजताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "जेव्हा प्रशासन आणि आमदार दुर्लक्ष करतात, तेव्हा सामान्य लोक पुढे येतात! जेव्हा अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी सुरू असलेल्या समस्येकडे दुर्लक्ष केलं, तेव्हा तिथं असणाऱ्या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला कोणाची वाट न पाहता, त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आपल्या शोरूमसमोरचे खड्डे स्वतः भरायला सुरुवात केली. केवळ परिसरातील लोकांच्या सुरक्षेसाठी आणि भल्यासाठी! हीच खरी जबाबदारी असते. अशा टीमला सलाम!".  सोशल मीडियावर नागरिकांकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी रस्त्यांवरील दुरवस्थेचा अनुभव शेअर करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :सुमीत राघवनमीरा-भाईंदर