Join us

"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:47 IST

"हे नुकसान कधीच भरुन निघणार नाही", ज्योती चांदेकरांच्या आठवणीत सुचित्रा बांदेकर भावुक

'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका ज्यांनी गाजवली त्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. अचानकच त्या सर्वांची साथ सोडून निघून गेल्या ज्याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा त्या पुण्याला चेकअपसाठी जायच्या हे सर्वांनाच ठाऊक होतं. मालिकेतील त्यांची भूमिकाही तशीच लिहिली जायची. मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी पहिल्यांदाच ज्योती चांदेकरांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. त्या कशा होत्या? त्यांना शेवटच्या क्षणी नक्की काय झालं होतं? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "ज्योती ताईंबरोबर मी याआधी कधीही काम केलं नव्हतं. बिंधास्त सिनेमात मी त्यांना बघितलं होतं. एक सीन कसा मॅजिक करु शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ज्योती चांदेकर. मी जेव्हा त्यांना मालिकेसाठी कास्ट केलं आणि त्यांनीही होकार दिला तेव्हा मला त्यांच्या तब्येतीबद्दल माहित होतं. त्या ज्या वयाच्या आहेत त्या वयात तब्येतीच्या तक्रारी असतातच. पण जेव्हा मी ज्योती ताईंना बघितलं तेव्हा मला वाटलं की काय बाई आहे यार! एक सत्तरीतली बाई मनाने एवढी तरुण कशी असू शकते? तिला नटण्याची, मुरडण्याची, खाण्याची, गप्पा मारण्याची, मेकअप करण्याची एवढी आवड कशी? या वयात बायका मेकअप वगरे नको गं बाई असं म्हणतात. जसं की सुहास जोशी. त्यांची मुळातच आजही सुंदर त्वचा आहे. त्यामुळे मेकअप वगरे त्या बास झालं म्हणतात. पण त्या बरोबर विरुद्ध ज्योती ताई होत्या. छान मेकअप, साड्या, दागदागिने. आमची ज्वेलरीवाली तिला काय दागिने देईल त्यापेक्षा उत्तमोत्तम तर ज्योती ताईचे स्वत:चे दागिने असायचे. सगळ्यांबरोबर गप्पा मारणं, हसणं असायचं."

त्या पुढे म्हणाल्या, " दर महिन्याला त्या ६-७ दिवस पुण्याला जाऊन यायच्या. ही त्यांची अॅडजस्टमेंट असायची. त्यांचं नेहमीचं चेकअप असायचं. त्यांच्या टॅलेंटला तर तोडच नाहीये. कोणत्याही प्रकारचा सीन असो तो लीलया पार पाडणं काय असतं, लेखकाने लिहिलेले आणि दिग्दर्शकाने स्वत:चे इनपुट्स टाकून त्याच्याही १०० पटीने तो सीन कसा करायचा हे त्या अभिनेत्रीकडून शिकण्यासारखं होतं. त्यांचा पहिला आवाजच काय लागायचा. आज कोणत्याच अभिनेत्रीचा तसा आवाज लागू शकत नाही. अशी ती जिंदा दिल बाई होती."

"आताच महासंगम एपिसोड शूट झाला. त्यात त्यांचंही थोडं शूट होतं. १० तारखेला आम्ही दोन्ही एकत्रच जेवलो. तेव्हा मला त्या म्हणाल्या की, 'सुचित्रा, मी ६ दिवस जाऊन येते.' मी म्हणाले, 'ज्योती ताई, ६ दिवस जाताय..आता बघताय ना किती कट टू कट शेड्युल आहे.' तर त्या म्हणाल्या, 'मला जायलाच पाहिजे. बघ पाय किती सुजले आहेत.'. मी म्हणाले, 'हरकत नाही'. १० तारखेला त्या सेटवरुन गेल्या. ११ तारखेला त्या पुण्याला गेल्या. त्यांची फिजिओथेरपी झाली. १२ तारखेला त्यांना अॅडमिट केलं. मला रात्री ११ वाजता तेजस्विनी पंडितचा फोन येत होता. मला वाटलं की हिचा का फोन येत असेल? मला वाटलं की ६ दिवस नाही तर आता १० दिवसांनी आई येईल असा निरोप वगरे असेल. नाहीतर तेजू मला का फोन करेल. मी फोन उचलल्यावर तेजस्विनीने मला सांगितलं की आईला व्हेंटिलेटरवर टाकलंय. माझं असं झालं,'काय?' मला मनात आलं की मी कालच तर त्यांच्याशी सगळं बोलले. तेजस्विनी म्हणाली, 'आईला संपूर्ण शरिरात बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय.' तिने ४ दिवस लढा दिला. पण अखेर ती गेली. हे नुकसान कधीच भरुन निघणार नाही. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं हे नुकसान आहे. ती खूपच गोड व्यक्ती होती. सेटवरच्या सगळ्यांना किती सहकार्य करायची. तिने इतकं काम केलं आणि शेवटी पूर्णा आजीची छाप सोडून गेली." असं सांगताना सुचित्रा बांदेकर भावुक झाल्या होत्या.

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार