Join us

"मी जेव्हा नाटक करेन त्यावेळी..."; सुबोध भावेने स्वत:लाच दिलं वचन; नक्की काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:42 IST

नुकतंच सुबोधने स्वत:लाच एक वचन दिलंय. नक्की कशाबद्दल बोलतोय तो वाचा.

मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याला नक्की कोणतं काम करायचंय, कसं करायचंय याबाबत तो एकदम ठाम असतो. मराठी मालिका, सिनेमा, हिंदी सिनेमा, वेबसीरिजमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक वर्षांपासून तो विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकतंच सुबोधने स्वत:लाच एक वचन दिलंय. नक्की कशाबद्दल बोलतोय तो वाचा.

'फिल्मी कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीत सुबोध भावे म्हणाला, "आम्ही खूप पुण्या-मुंबईमध्ये अडकलोय. महाराष्ट्र फक्त पुण्या-मुंबईपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्र अखंड पसरला आहे. अगदी वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोलीपासून ते खाली कोकण सिंधुदुर्गापर्यंत आडवा तिडवा पसरलेला महाराष्ट्र आहे. धुळे, नंदुरबार तर मला आठवतही नाही मी तिकडे कधी गेलोय. म्हणजे ती शहरं महाराष्ट्रात आहेत हे आपण धरतही नाही. नाटक असेल किंवा सिनेमा फक्त या दोन शहरांपुरता मर्यादित न ठेवता तो महाराष्ट्रात कसा पसरेल, महाराष्ट्राबाहेर कसा पसरेल याचा जास्त विचार केला पाहिजे. अश्रूंची झाली फुले च्या निमित्ताने मी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सगळीकडे फिरलो. मी जेव्हा नाटक करेन तेव्हा मी स्वत:ला एक वचन दिलंय की महाराष्ट्रात जिथे जिथे नाट्यगृह आहेत तिथे तिथे माझा एक तरी प्रयोग नक्की होणार."

सुबोध भावे आगामी 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. तसंच त्याचा 'संत तुकाराम' हा हिंदी सिनेमाही प्रदर्शित होत आहे. सुबोध नेहमीच काही ना काही वेगळे प्रयोग करत असतो. 'बालगंधर्व' सारखा सिनेमा असेल किंवा 'तुला पाहते रे' मालिका प्रत्येक भूमिकेत तो उठून दिसला आहे.

टॅग्स :सुबोध भावे मराठी अभिनेतानाटक