मराठी नाटक व मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale). 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा' अशा अनेक मालिकांमधून अभिनय करत त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आशुतोष गोखले सध्या चर्चेत आहे. कारण, तो एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे, तो नायक नाही तर मालिकेत खलनायक पात्र साकारणार आहे.
स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरू होतेय. २३ डिसेंबरपासून 'तू ही रे माझा मितवा' (Tu Hi Maza Mitwa) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आशुतोष गोखले हा खलनायक भुमिकेत असेल. 'तू ही रे माझा मितवा' मालिकेचा लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या निमित्ताने खास यॉटवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तो मालिकेत खलनायक पात्र साकारणार असल्याचं स्पष्ट झालं.
लाँच सोहळ्यात मालिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, "मालिकेतील पात्रबद्दल फार नाही सांगू शकणार, पण खलनायक पात्र आहे. त्यामुळे त्याच जे ट्विस्ट आणि टर्न्स असतील ते मालिका जशी सुरू होईल तशी दिसतील. हे करायला नक्की एक वेगळी मजा येते आहे. मी कधीच याआधी खलनायक साकारला नव्हता आणि ती संधी मला स्टार प्रवाह वाहिनीने दिली. त्याबद्दल मी वाहिनीचा आभारी आहे".
'रंग माझा वेगळा' या स्टार प्रवाहच्याच मालिकेत आशुतोषनं 'डॉ. कार्तिक इनमादार' ही प्रेमळ नायकाची भूमिका साकारली होती. आता पहिल्यांदाच तो खलनायक साकारत आहे. आशुतोषशिवाय, या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग (Sharvari Jog ) आणि अभिनेता अभिजीत आमकर (Abhijit Amkar) मुख्य भूमिकेत आहेत. 'तू ही रे माझा मितवा' मितवा मालिका 'इस प्यार को क्या नाम दूँ' या स्टार प्लसवरील हिंदी मालिकेचा रीमेक आहे. त्या मालिकेत श्याम नावाचे पात्र खलनायक होतं. आशुतोषही तीच भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.