Star Pravah Horror Serial : प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेली महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या ‘स्टार प्रवाह’वर लवकरच एक नवीन हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाहिनीने सोशल मीडियावर 'तुम्हाला गूढ कथानक पाहायला आवडेल का?' अशा आशयाच्या पोस्ट शेअर करून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. '३०० वर्षांनी ती परत येतेय' असे गूढ कॅप्शन देत नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.
'काजळमाया' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळतंय की, रात्री उशिरा एक तरुण अंधारात आपला मोबाईल पाहत हसत जिने चढत असतो. इतक्यात मागून पैंजणांचा आवाज आल्यनं तो तिथेच थांबतो आणि जिन्यांवरून खाली डोकावतो. पण, तिथे कुणीच उभं नसतं. यानंतर पैंजणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून तो तरुण वरच्या मजल्याच्या दिशेने चालत गेल्यावर खाली अंधारात एका महिलेची सावली दिसते. आता ही स्त्री नेमकी कोण आहे, ३०० वर्षांचा आणि तिच्या परतण्याचा नेमका संबंध काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील.
'काजळमाया' ही एक चेटकीण वंशामधील पर्णिका नावाच्या विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत पारंगत असलेल्या चेटकिणीची गोष्ट आहे. तिला चिरतारुण्याचे वरदान असून, ती स्वार्थी, निर्दयी आणि महत्त्वाकांक्षी आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि चेटकीण वंश वाढवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. या मालिकेमध्ये अभिनेता अक्षय केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो या मालिकेत आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे. आरुष कवी मनाचा असून तो साधा, सरळ आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा आहे. तो मराठी विषयाचा प्राध्यापक असून, त्याला कविता वाचनाची विशेष आवड आहे. जेव्हा चेटकीण पर्णिकेच्या या महत्त्वाकांक्षेला आरुषकडून आव्हान मिळते, तेव्हा एका अद्भुत गोष्टीची सुरुवात होते.
काजळमाया मालिकेतल्या आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला, "मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. पहिल्यांदा गूढ मालिकेत अश्या पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे", अशी भावना अक्षय केळकरने व्यक्त केली. तर स्टार प्रवाहच्या या नव्या प्रयोगाबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, "गूढ, उत्कंठावर्धक असे विषय कायम रसिकांच्या स्मरणात रहातात. प्रेक्षकांनी अश्या विषयांना आधी पण पसंती दिली आहे. काजळमाया हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा विषय ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने काजळमाया खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी गूढ मालिका काजळमाया लवकरच फक्त स्टार प्रवाहवर".