झी मराठीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकतीच या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sable) यंदाच्या सीझनमध्ये दिसणार नसल्याचे समोर आले. त्याच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) दिसणार असल्याचे समजताच प्रेक्षकांना निलेश या शोमधून का बाहेर पडला, असा प्रश्न पडला. सोशल मीडियावर त्यावर नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आता अभिनेता निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून माघार घेण्यामागचे कारण सांगितले आहे.
खरेतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी 'चला हवा येऊ द्या'मध्ये निलेश साबळेच्या जागी अभिजीत खांडकेकर दिसणार असल्याचे समजताच सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी निलेश साबळेवर अनेक आरोप केले होते. त्यांना तो सूत्रसंचालक असताना सेटवर कशी वागणूक मिळाली होती. याबद्दल लिहिले होते. त्यानंतर निलेशने त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओतच निलेश साबळेने हा शो सोडण्यामागचं कारणही सांगितलं.
निलेश साबळे म्हणाला...
या व्हिडीओत निलेश साबळेने सांगितले, झी मराठीच्या अधिकृत पदावर जी व्यक्ती हेड म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी मला अनेकवेळा फोन केले. झी मराठीचे नॉन फिक्शन हेड रोहन राणे यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले. चला हवा येऊ द्या सुरू करतोय. डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही. आपण एकदा मिटींग करूयात. त्यानंतर महिन्याभरापूर्वी माझी दोन तास झी मराठीबरोबर सविस्तर मिटींग झाली. त्यांच्या वरळीच्या ऑफिसला आमचं सगळं बोलणं झालं होतं. माझ्या काही अडचणी होत्या, मी सध्या एक सिनेमा करतोय त्यात मी सध्या अडकलो आहे. त्याचे शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे माझ्या तारखा जुळल्या नाहीत. याशिवाय यामागे अनेक कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेतो अशी विनंती मी त्यांना केली होती.
भाऊ कदमही दिसणार नाही 'चला हवा येऊ द्या'मध्येया व्हिडीओत निलेशने भाऊ कदमदेखील यंदाच्या 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार नसल्याचा खुलासा केला. कारण ज्या सिनेमाच्या कामात डॉक्टर साबळे व्यग्र आहे. त्याच सिनेमात भाऊ कदमदेखील काम करत आहेत. ''ते माझ्याच सिनेमात माझ्याबरोबर काम करत आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमात नसतील. दोन लोक या कार्यक्रमात नाहीत'', असे निलेशने सांगितले.