स्मृती इराणी यांनी मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. यानंतर त्या राजकारणात आल्या आणि त्यांनी तिथेही आपला ठसा उमटवला. त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी आता आपल्या भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मोजो स्टोरी या कार्यक्रमात करण जोहरसोबत झालेल्या संवादात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या. स्मृती इराणी यांना मोजो स्टोरीमध्ये तुमच्या आयुष्याचं वर्णन करणारं गाणं कोणतं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर स्मृती यांनी सांगितलं की, 'कुछ कुछ होता है' पासून 'अग्निपथ' पर्यंत आहे. "'अग्निपथ' या चित्रपटातील एका मुलगा आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आईवर अन्याय झाला म्हणून बदला घेतो" असं म्हटलं आहे.
"माझ्या आईला घर सोडावं लागलं कारण..."
स्मृती इराणी यांनी आपल्या आईशी संबंधित एक भावनिक गोष्ट देखील यावेळी सांगितली. "मला माझ्या आईबद्दलही असंच वाटायचं. मी ७ वर्षांची असताना, माझ्या आईला घर सोडावं लागलं कारण तिला मुलगा झाला नाही. माझ्यासाठी ते अग्निपथ होतं. मला माझ्या आईला परत आणायचं होतं आणि तिला घर द्यायचं होतं" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
मालिकेचा दुसरा सीझन येणार
'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेत तुलसी विरानी या भूमिकेत स्मृती इराणींनी आदर्श सुनेचं उदाहरण सर्वांना दिलं. याच मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याचं निर्माती एकता कपूरने जाहीर केलं. याविषयी स्मृती इराणींना टाइम्स नाऊच्या एका कार्यक्रमात विचारण्यात आलं. त्यावेळी स्मृती इराणींनी कोणतीच प्रतिक्रिया न देता फक्त 'हम्मम' एवढच म्हटलं. त्यामुळे स्मृती इराणी 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये खरंच काम करणार की नाही, याविषयी काहीच कळालेलं नाही.स्मृती इराणींनी दिलेली ही मोजकीच प्रतिक्रिया सर्वांना संभ्रमात पाडणारी आहे.