मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर(Akshay Kelkar)ने नुकतेच गर्लफ्रेंड साधना काकटकरसोबत विवाहबंधनात अडकला आहे. १० वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ९ मे रोजी दोघांनी लग्न करून नवीन सुरूवात केली आहे. त्याच्या लग्नाला कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दरम्यान आता त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
अभिनेता अक्षय केळकरने इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून शुभ मंगल सावधान असे कॅप्शन दिले आहे. यावेळी साधनाने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर मरुन रंगाचा शेला घेतला आहे. तर अक्षयने पांढऱ्या रंगाचं धोतर, मरून रंगाचा शेला आणि पेशवाई पगडी घातली आहे. या लूकमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. या व्हिडीओत त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.
अक्षय केळकर आणि साधना काकटकर हे दोघेही जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉसच्या घरात असताना अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख 'रमा' असा केला होता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अक्षय केळकरने गर्लफ्रेंड साधनाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला होता. अक्षयनं होणाऱ्या बायकोची ओळख चाहत्यांना करून दिली होती. साधना काकटकर ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे. अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कलर्स मराठीवरच्या 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता होता.