'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण, यंदाच्या पर्वात भाऊ कदम आणि निलेश साबळे नाहीत. त्यामुळे या नवीन पर्वात प्रेक्षक त्यांना मिस करत आहेत. नवीन पर्वात नवीन चेहरे दिसत असले तरी भाऊ कदम आणि निलेश साबळेची कमी प्रेक्षकांना जाणवत आहे. श्रेया बुगडेनेही भाऊ आणि डॉक्टरला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.
श्रेयाने हंच मीडिया या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाबद्दल भाष्य करताना भाऊ कदम आणि निलेशला प्रेक्षकही मिस करत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "डॉ. निलेश साबळे आणि भाऊ या नवीन पर्वात नाहीत. त्यांची वैयक्तिक वेगळी कारणं आहेत. ते एकत्र शूटिंगही करत आहेत. आम्ही त्यांना मिस करतोच आणि प्रेक्षकही करतात. पण, मला असं वाटतंय की हा 'चला हवा येऊ द्या'चा नवीन सीझन आहे. त्यात अनेक नवीन गोष्टी दिसणार आहेत ज्या आपण याआधी पाहिलेल्या नसतील. तर मला असं वाटतं की फॉरमॅटच वेगळा आहे तर प्रेक्षकांनासुद्धा थेट तुलना करण्यासारखं काही नाही. या पर्वात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नवीन टॅलेंट आम्ही शोधून आणलं आहे".
"एखाद्या जॉनरमध्ये जेव्हा आपण चांगलं काम करतो. १० वर्ष 'चला हवा येऊ द्या' सुरू होतं. यामागे संपूर्ण टीमचं श्रेय होतं. पण, जेव्हा एखादी गोष्ट थांबते आणि ती पुन्हा सुरू होते तेव्हा लोकांना त्यात नाविन्य हवं असतं. पुन्हा जर 'चला हवा येऊ द्या'च्या टीमने येऊन तेच केलं असतं तर लोकांचा हिरमोड झाला असता. त्यामुळे कुठेतरी नाविन्य असायला हवं असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. बदल हा झालाच पाहिजे तरच सगळ्यांची एकत्र मिळून ग्रोथ होते", असंही श्रेया म्हणाली.