Join us

"ती सुटली ते बरं झालं...", अजूनही प्रिया मराठेच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नाही शिवानी, म्हणाली- "देव चांगल्या लोकांसोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:04 IST

शिवानी सोनारने प्रिया मराठेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवानी आणि प्रियाने 'तू भेटशी नव्याने' मालिकेत एकत्र काम केलं होतं. या धक्क्यातून सावरणं कठीण असल्याचं शिवानीने म्हटलं आहे.

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. गेली दोन वर्ष प्रिया कर्करोगाचा सामना करत होती. मात्र अखेर ३१ ऑगस्ट रोजी तिची ही झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होत तिच्याबद्दलच्या आठवणी सांगत शोक व्यक्त केला. आता शिवानी सोनारने प्रिया मराठेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवानी आणि प्रियाने 'तू भेटशी नव्याने' मालिकेत एकत्र काम केलं होतं. या धक्क्यातून सावरणं कठीण असल्याचं शिवानीने म्हटलं आहे. 

शिवानी अल्ट्रा मराठी बझ या युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाली, "खरं तर तिच्या निधनानंतर मी तिचा फोटो वगैरे शेअर केला नव्हता किंवा स्टोरीही शेअर केली नव्हती. कारण मला ती हिंमतच झाली नाही. हे सगळं पचवायला मला दोन दिवस तरी लागले. आम्हाला या सगळ्याची थोडी फार कल्पना होती. तिचा शेवटचा शो आम्ही एकत्र केला. फार वेळ आम्ही एकत्र नव्हतो. महिना दीड महिना मी तिच्यासोबत मेकअप रुप शेअर केलेली आहे. पण, ते असतं ना काही माणसं तुमच्यासोबत कायम राहतात. आणि मला वाटतं ती राहील. तेव्हा ही गोष्ट जाणवली नव्हती. पण, अख्या इंडस्ट्रीतून कलाकार तिच्या बद्दल वेगवेगळ्या भावना व्यक्त करत होते. तेव्हा तिचं मोठेपण खऱ्या अर्थाने कळलं". 

"ती मी आणि भक्ती रत्नपारखी आम्ही तिघी रुम शेअर करायचो. मी पुण्यात असल्यामुळे मला तिच्या अंत्यदर्शनाला जाता नाही आलं. पण, भक्ती ताई गेली होती. दुसऱ्या दिवशी आमच्या दोघींचं बोलणं झालं. असं वाटतं की त्या त्रासातून सुटली ते बरं झालं. तिला शेवटी खूप जास्त त्रास होत होता. एवढ्या चांगल्या व्यक्तीला एवढ्या यातना नको असं वाटत होतं. पण आता ती जिथे कुठे असेल तिथे १०० टक्के सुखी असेल. त्यात वादच नाही. देव चांगल्या माणसांसोबत खूप वाईट गोष्टी करतो. असं काहीतरी प्रियाताईच्या बाबतीत झालं", असंही तिने सांगितलं. 

टॅग्स :प्रिया मराठेटिव्ही कलाकारकर्करोग