Join us

सासू-सुना एकत्र झळकल्या; शिवानी पोस्ट शेअर करत म्हणाली, "आवडत्या अभिनेत्रीबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:24 IST

आता पुन्हा मृणाल कुलकर्णी आणि शिवानी ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. याबाबत शिवानीने खास पोस्ट शेअर केली आहे. 

मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय सासू-सुनेची जोडी आहे. मृणाल कुलकर्णींचा लेक विराजस कुलकर्णीशी लग्नगाठ बांधत शिवानीने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. शिवानी आणि मृणाल कुलकर्णींचं नातंही खूप खास आहे. एका सिनेमात ही सासू-सुनेची जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. आता पुन्हा मालिकेच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी आणि शिवानीने एकत्र काम केलं आहे. याबाबत शिवानीने खास पोस्ट शेअर केली आहे. 

शिवानीने मृणाल कुलकर्णींबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला तिने खास कॅप्शनही दिलं आहे. "माझी आवडती अभिनेत्री आणि आवडत्या मैत्रिणीबरोबर काम केलं", असं शिवानीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

शिवानी आणि मृणाल कुलकर्णी झी मराठीवरील नवीन मालिकेच्या प्रोमोसाठी एकत्र झळकल्या. याचा व्हिडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिवानी आणि मृणाल कुलकर्णी 'पारू' या नव्या मालिकेबद्दल सांगताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेत्री अश्विनी भावेदेखील दिसत आहे. 

याआधी शिवानी आणि मृणाल कुलकर्णी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' सिनेमात एकत्र झळकल्या होत्या. त्यांच्याबरोबर विराजस कुलकर्णीही या सिनेमात दिसला होता. सध्या शिवानी झी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. 

टॅग्स :शिवानी रांगोळेमृणाल कुलकर्णीटिव्ही कलाकार