Join us
Daily Top 2Weekly Top 5

Big Boss OTT: अभिनेत्री शमिता शेट्टीचा मोठा गौप्यस्फोट; निशांतनं एकदा माझ्यासोबत लाइन क्रॉस केली होती, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 11:02 IST

बिग बॉसच्या घरामध्ये शमिता शेट्टीने प्रतिक सहजपालसोबत झालेल्या भांडणाबाबत खुलासा करून नव्या वादाला तोंड फोडलं होतं.

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी(Shamita Shetty) सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये दिसून येत आहे. शमिताने बिग बॉसमध्ये अशावेळी एन्ट्री केली आहे जेव्हा तिची बहिण अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा जेलमध्ये आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वीच शमिता शेट्टी माध्यमामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. शमितानं बिग बॉस स्पर्धेत भाग घेण्याच्या निर्णयावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये शमिता शेट्टीने प्रतिक सहजपालसोबत झालेल्या भांडणाबाबत खुलासा करून नव्या वादाला तोंड फोडलं होतं. शमिताने अलीकडेच निशांत भट्ट संबंधित असा गौप्यस्फोट केला की सर्व हैराण झाले आहेत. डान्स कोरियाग्राफर निशांत भट्टने शमितासोबत अश्लिल वर्तवणूक केली होती. इतकचं नाही तर शमितानं निशांतला इशारा देत त्याच्यापासून अंतर ठेवलं होतं. परंतु पुन्हा एकदा निशांत आणि शमिता बिग बॉसच्या घरात आमनेसामने आले आहेत. त्यामुळे शमितानं तो कटू प्रसंग पुन्हा आठवला.

१० ऑगस्टच्या भागात शमिता शेट्टी स्पर्धक दिव्या अग्रवालसोबत बेडवर झोपली होती. या दोघींमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी शमिता शेट्टीनं दिव्याला सांगितले की, एका कार्यक्रमात निशांतनं माझ्यासोबत लाइन क्रॉस केली होती. त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटलं. त्यानंतर मी निशांतसोबत अंतर ठेवलं त्याच्यासोबत बोलणंही बंद केले होते. निशांतनं मर्यादा ओलांडणं मला अजिबात आवडलं नाही. निशांतने जे काही केले ते चुकीचं होतं. त्यानंतर आमचं बोलणं बंद झालं. मला वाटलं तेव्हापासून मी निशांतपासून अंतर ठेवलं कारण तो प्रसंग मला पुन्हा समोर आणायचा नाही असं तिने सांगितले.

कोण आहे निशांत भट्ट?

निशांत भट्ट हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आहे. त्यामुळे अभिनेत्री शमिता शेट्टीने निशांतवर केलेले गंभीर आरोप ऐकल्यानं अनेकजण हैराण झालेत. माहितीसाठी २००९ मध्येही बिग बॉस स्पर्धेत शमिता शेट्टीनं सहभाग घेतला होता.

गेल्या रविवारी ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT) प्रीमिअर रंगला. करण जोहर (Karan johar) होस्ट म्हणून स्टेजवर आला आणि पाठोपाठ १३ स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. या १३ पैकी एका महिला स्पर्धकाची सध्या जोरदार चर्चा झाली. ती म्हणजे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty).

खरं तर, शमिताला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते जरा हैराण झालेत. कारणही तसंच होतं. शमिताचा जीजू राज कुंद्रा जेलमध्ये आहे. बहिणीच्या चिंता वाढल्या आहेत. अशा अडचणीच्या काळात शमिता कुटुंबियांना एकटं सोडून बिग बॉसमध्ये आली हे पाहून अनेकांना धक्का बसला.

टॅग्स :शिल्पा शेट्टीबिग बॉसराज कुंद्राकरण जोहर