Join us
Daily Top 2Weekly Top 5

"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:51 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही, डोकंच काम करणं बंद होतंय बघा, असं म्हणत संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केली आहे.

 Sankarshan Karhade : मराठी सिनेसृष्टीचा सध्याचा सर्वगुण संपन्न अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. तो टीव्ही मालिका, सिनेमा, नाटक, लेखन या सर्वच क्षेत्रात पारंगत आहे. विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. संकर्षण सध्या नाटक, टीव्ही आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांत मुशाफिरी करत असतो.  संकर्षण विविध माध्यमांत कार्यरत असला तरीही त्याने रंगभूमीची कास सोडली नाही.  संकर्षणचा आणि अभिनेत्री स्पृहा जोशीचा '‘संकर्षण व्हाया स्पृहा' हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. हा कार्यक्र त्यांच्या अनोख्या शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमाचे आजवर महाराष्ट्र आणि इतर देशांत हाऊसफुल्ल प्रयोग सादर झाले आहेत. प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाचं वेळोवेळी कौतुक झालं आहे. 

 नुकतंच त्याचा 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा कार्यक्रम कराड येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संकर्षणने पश्चिम महाराष्ट्रातील पदार्थांवर ताव मारला. याबद्दलची खास पोस्ट संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केली आहे. जेवणाच्या ताटाचा फोटो पोस्ट करत त्यानं लिहलं, "क्या बात है… पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही… डोकंच काम करणं बंद होतंय बघा…! असला वाद खुळा जेवलोय कराडमध्ये… ज्वारीची अन् बाजरीची भाकरी, भरलं वांगं, अख्खा मसूर, शेवभाजी… सगळ्यात शेटवी मऊ मऊ इंद्रायणी भात… हे सगळं तुमच्याशी शेअर केलं केल्यावर जास्त पोट भरतंय बघा… बाकी बरंय नव्हं…???आणि हो, या गाण्याचा आन् फोटूचा काहीच संबंध नाहीये… पण जेवताना हेच गाणं लावलं हूतं तिथल्या पोरानं…". 

संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. यासोबतच संकर्षणने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट करत छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या 'संकर्षण कऱ्हाडे नाट्य महोत्सवा'बद्दल माहिती दिली आहे. येत्या १५ ते १७ जानेवारी रोजी हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाला मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती लावावी असं आवाहन संकर्षणने केलं आहे.

 

टॅग्स :मराठी अभिनेताकराडसेलिब्रिटीमहाराष्ट्र