Samay Raina: स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "इंडियाज गॉट लेटेंट" शोमध्ये रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समय वादात सापडला होता. त्यानंतर समयनं शोचे सर्व एपिसोड्स YouTube वरून काढून टाकले होते. पण, संपुर्ण वादग्रस्त प्रकरणानंतर त्यानं कमबॅक केलं. पण, आता समय पुन्हा चर्चेत आलाय. महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे समयनं महिला आयोगासमोर हजेरी लावत लेखी माफीनामाद्वारे खेद व्यक्त केला.
'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये पालकांबद्दल केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे आधीच वादात सापडलेला समय रैना मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाला. "इंडियाज गॉट लेटेंट" या कार्यक्रमात महिलांविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीवरून महिला आयोगाने समय रैनाला नोटीस बजावली होती. आरोपांना उत्तर देताना समयनं आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आपलं म्हणणं सादर केलं. त्याने स्पष्ट केलं की, त्याचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासनही दिलं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या माफीनाम्याची समीक्षा केल्यानंतर पुढील कारवाईचा विचार केला जाईल.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यावेळी वक्तृत्व स्वातंत्र्याच्या मर्यादा आणि सार्वजनिक व्यासपीठावर जबाबदारीने वागण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी समय रैनाला स्पष्टपणे सांगितले की, विनोद करताना महिलांच्या सन्मानाची आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवली गेली पाहिजे. तसेच, भविष्यात अशा कोणत्याही प्रकारच्या टीका किंवा टिप्पणी टाळण्याचे निर्देशही त्यांनी दिले. समय रैनाला महिला आयोगाने सल्ला दिला आहे की, त्यानं आपल्या व्यासपीठाचा उपयोग महिलांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी करावा.