युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' अडचणीत आला आहे. रणवीर अलाहाबादियासह समय रैना आणि त्याच्या या शोविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टानेही युट्यूबरला चांगलंच सुनावलं. या संपूर्ण प्रकरणाचा मात्र समय रैनाला मोठा धक्का बसला असून त्याच्यावर याचा गंभीर परिणाम झाल्याचं दिसत आहे. या प्रकरणामुळे समय रैना डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा नुकतंच एका युट्यूबरने केला आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' कॉन्ट्रोव्हर्सीनंतर युट्यूबर श्वेताभ गंगावर याने समय रैनाला फोन केला होता. त्यानंतर एक व्हिडिओ शेअर करत श्वेताभने समय रैनाबाबत सांगितलं. "भाईसाहब, तो पूर्णपणे तुटला आहे. जेव्हा हे सगळं सुरू झालं होतं तेव्हा मला त्याच्यात जुना समय दिसत होता. मात्र, आता जेव्हा मी त्याच्याशी बोललो मला तो हतबल मनुष्यासारखा जाणवला. दु:खी, चिंताग्रस्त आणि घाबरलेला", श्वेताभने सांगितलं. समय रैनाने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतल्याचंही श्वेताभने त्याच्या व्हिडिओत सांगितलं आहे.
सध्या समय रैना कॅनडामध्ये असून तिथे लाइव्ह शो करत आहे. १७ मार्चला तो भारतात येणार आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' कॉन्ट्रोव्हर्सीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी त्याने कोर्टाकडे १७ मार्चपर्यंतची वेळ मागितली आहे. दरम्यान, रणवीर अलाहाबादियाचं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व एपिसोड युट्यूबवरुन काढून टाकण्यात आले आहेत.