Sagar Karande On New Season Of Chala Hava Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय आहे. जवळपास १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता 'चला हवा येऊ द्या'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीर्घकाळ विश्रांती घेतल्यानंतर सुरू होणाऱ्या या पर्वामध्ये असंख्य बदल पाहायला मिळणार आहेत. 'चला हवा येऊ द्या २' चा नवा प्रोमो नुकताच समोर आलाय. यात मागील सीझनमधील चेहऱ्यासोबतच यात काही नवीन चेहरेही दिसतायत. यात श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे तिघेही या सीझनचा भाग आहे. त्यांच्यासोबत गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधवदेखील या सीझनची रंगत वाढवणार आहे. पण, या नव्या सीझनमध्ये लोकप्रिय अभिनेता सागर कारंडे पाहायला मिळणार की नाही, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
नव्याने सुरु होत असलेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं यावेळेस रुपरंग वेगळा असणार आहे. यावेळेस कार्यक्रमाचा आधीचा दिग्दर्शक, लेखक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे कार्यक्रमाचा भाग नाहीये. तसेच भाऊ कदमदेखील या कार्यक्रमात नसतील. त्याच्यासोबतच आणखी एक व्यक्ती या कार्यक्रमाचा भाग नाहीये. तो व्यक्ती म्हणजे हास्याचा विनोदवीर सागर कारंडे. आता सागर कांरडे या सीझनमध्ये का नाहीये याचं कारण समोर आलंय. 'मराठी मूड' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडेनं तो कार्यक्रमाचा भाग(Sagar Karande Not In Chala Hawa Yeu Dya New Season) नसल्याचं सांगितलंय.
तो म्हणाला, "मी 'चला हवा येऊ द्या'मध्ये आता नाहीये. खरंतर मी तो कार्यक्रम मध्यंतरी बंद झाला, त्याच्या २ वर्षांआधीच मी सोडला होता. कारण, मला जरा वेगवेगळं काम करून पाहायचं होतं. त्यामुळे नव्या पर्वातही मी नसेन". दरम्यान, सागर कारंडेने काही महिन्यांपूर्वी गेल्या १७ मार्चला सोशल मीडिया पोस्ट शेअर करत 'यापुढे स्त्री पात्र करणार नाही' असं जाहीर केलं होतं. विनोदाची उत्तम जाण असलेला सागर कारंडे हा कलाविश्वातील उमदा आणि हरहुन्नरी कलाकार आहे. सध्या त्याच्या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २०१४ साली 'लयभारी' या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यात 'होऊ दे व्हायरल', 'सेलिब्रिटी पॅटर्न', 'लहान तोंडी मोठा घास', अशा अनेक पर्वांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची भूरळ हिंदी मनोरंजनसृष्टीलाही पडली होती. अनेक बॉलिवूडपटाचं प्रमोशन या मंचावर करण्यात आलं. आता मोठ्या ब्रेकनंतर खळखळून हसवणारा हा कार्यक्रम येत्या २६ जुलैपासून दर शनिवार आणि रविवारी ९ वाजता प्रसारित होईल.