Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:39 IST

अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला अशी बातमी समोर येत आहे. रुपालीने अनुपमाच्या सेटवरुन इन्स्टाग्राम लाइव्ह येऊन खरं काय ते सांगितलं

'अनुपमा' मालिका (anupama) सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुलीने (rupali ganguly) प्रमुख भूमिका साकारली आहे. रुपाली सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. रुपाली गांगुलीविषयी सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्याविषयीची एक बातमी म्हणजे रुपालीला अनुपमा मालिकेच्या सेटवर कुत्रा चावला! रुपालीने ही बातमी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला असून 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर लाइव्ह येऊन खरं काय ते सांगितलं. 

'अनुपमा'च्या सेटवर रुपालीला कुत्रा चावला?

रुपालीने सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन सांगितलं की, "सॉरी न सांगता मी लाइव्ह आले आहे." त्यानंतर रुपाली सेटवर असलेल्या कुत्र्यांकडे कॅमेरा फिरवते. या कुत्र्यांना ठेवलेली नावं रुपाली सांगते. पुढे ती म्हणते, "नुकतीच एक बातमी वाचण्यात आली की, रुपालीला अनुपमा मालिकेच्या सेटवर कुत्र्याने चावलं. ही आजपर्यंतची सर्वात बेकार बातमी आहे. माझ्याबद्दल आजपर्यंत खूप काही लिहिलं गेलंय. पण मी त्यावर कधी प्रतिक्रिया दिली नाही. मी काम करत असल्याने माझ्याबद्दल काय छापून येतंय याचा मला फरक पडत नाही. परंतु ही बातमी लिहिण्याआधी एकदा मला विचारावं असं कोणालाही वाटलं नाही. कमीतकमी मुक्या प्राण्यांना तर सोडा. तुम्ही त्यांच्याविषयी लिहित आहात जे स्वतःसाठी काही बोलू शकत नाहीत."

"ही सर्व अनुपमाच्या सेटवरची मुलं आहेत. यात एक माकडही आहे ज्यांना मी स्वतःच्या हाताने खायला घालते. सेटवरची ही सर्व मुलं आहेत. इथे कोणीही प्राणी तुम्हाला चावणार नाही. मला कुत्र्याने चावलं, याविषयीचे मेसेज अचानक येऊ लागले. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कसं काय छापू शकता. कमीतकमी काही लिहिण्याआधी पडताळणी करुन घ्या. मी हात जोडून विनंती करते की, मुक्या प्राण्यांना या सर्व गोष्टीत मध्ये नका आणू."

"इतक्या वर्षांपासून मी या मुलांना खाऊ घालतेय. आजवर कधीच असं झालं नाही.  जोवर त्यांना कोणता त्रास होत नसेल, ते कोणत्या गाडीखाली येत नाहीत, तेव्हा त्यांना समजतं त्यांना माणसं त्यांना मारायला येत आहेत की वाचवायला. त्यांच्यावर जर एखाद्याने गाडी घातली असेल तर अशी घटना क्वचित घडली असेल. परंतु त्यांच्याबद्दल असं लिहिणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. जगात आणि देशात इतक्या गोष्टी घडत आहेत तुम्ही त्याबद्दल लिहा. आपली सेना इतकं चांगलं काम करते आहे,  त्याबद्दल लिहा. आपले पंतप्रधान देशाला नव्या उंचीवर घेऊन गेले आहेत, त्याविषयी लिहा. मी एकदम ठीक आहे. मी हात जोडून विनंती करते की काहीही लिहिण्याआधी एकदा वेरिफाय करा."

टॅग्स :कुत्राटेलिव्हिजन