टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) हिमाचल प्रदेशची आहे. तिथेच लहानाची मोठी झाली आहे. सध्या पंजाब, हिमाचल प्रदेशमधील पूरस्थिती पाहता रुबिनाने सोशल मीडियावरुन दु:ख व्यक्त केलं आहे. तिच्या जुळ्या मुली आणि आई वडील हिमाचल प्रदेशमधील फार्म हाऊसवरच अकडले असल्याचा खुलासाही तिने केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने तिथली परिस्थिती सांगितली आहे.
रुबिना दिलैक म्हणाली, "अनेकांनी मला कमेंट करुन सांगितले की तू हिमाचलमध्ये आलेल्या पूरावर काहीच का बोलत नाहीस. तिथे स्थिती खूप खराब झाली आहे. झाडं उन्मळून पडली आहेत, विजेचं कनेक्शन तुटलं आहे, रस्त्यावर पाणी वाहत आहे. माझ्याकडे खरंच बोलायला काहीच नाही. निसर्गापुढे आपण काहीच करु शकत नाही. गेल्या चार दिवसांपासून माझंच कुटुंब हिमाचलमधील आमच्या फार्म हाऊसवर आहे. माझे आई वडील, माझ्या दोन्ही मुली आणि आजी एवढेच तिथे राहत आहेत. तीन दिवसांपासून फार्म हाऊसवर वीज नाहीये. नेटवर्क नाहीये. पाण्याचा स्त्रोतही आता पूराचाच आहे. सगळे सुरक्षित आहेत पण ज्या परिस्थितीतून सगळे जात आहेत त्यात आपण फक्त प्रार्थनाच करु शकतो. मला इथे बसल्या बसल्या सतत चिंता लागलेली असते."
ती पुढे म्हणाली,"गेल्या दोन आठवड्यांपासून मी आणि अभिनव आमची फ्लाईट रिशेड्युल वर रिशेडयुल करत आहोत. पण आम्हाला संधीच मिळत नाहीये. कधी कुठे तर कधी कुठे दरड कोसळत आहे. १५ दिवसांपूर्वी जेव्हा मी गेले होते तेव्हा मी स्वत: तीन दिवस अडकले होते. हिमाचल, पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे त्यात अनेक लोक कठीण परिस्थितून जात आहेत मी समजू शकते. मी देवाकडे फक्त प्रार्थना करु शकते की सगळ्यांना सुरक्षित ठेव. सोशल मीडियावरुन जर फंड गोळा करायचे असतील तर तेही मी करेन. मला हेच सांगायचं आहे की मी आणि माझं कुटुंबही या परिस्थितीचा सामना करत आहे. आपण या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडू आणि सगळे सुरक्षित राहू दे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्या कुटुंबाबद्दल मला सहानुभूती आहे."
रुबिना दिलैकच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. तसंच हिमाचलमधील पूरस्थितीबद्दल खेद व्यक्त केला आहे. रुबिना आणि पती अभिनव सध्या 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहे.