Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, रितेश देशमुखची होणार मालिकेत एंट्री; गौरीला देणार प्रेमाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:06 IST

महाराष्ट्रातले क्युट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या 'वेड' या मराठी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्याने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली आहे.

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीच्या नात्यात बरीच उलथापालथ सुरु आहे. मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात स्वराजमुळे कटुता निर्माण झालीय. तर तिकडे जयदीप-गौरीही एकमेकांपासून दुरावले आहेत. दोन्ही मालिकांमध्ये जरी नात्यात दुरावा निर्माण झाला असला तरी प्रेम मात्र निरंतर आहे. याच प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी मालिकेत दोन खास पाहुणे येणार आहेत.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या सेटवर रितेश आणि जिनिलिया दोघांनीही खास भेट दिलीय. नातं प्रेमामुळे टिकतं. कितीही अडचणी आल्या तरीही प्रेमासाठी खंबीर रहायचं. आपण हरलो तर प्रेमही हरतं म्हणून हिंमतीने लढायचं हा अनोखा संदेश रितेश-जिनिलियाने स्वराज आणि मल्हारला दिलाय.

तुझेच मी गीत गात आहे प्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतल्या गौरीसोबतही रितेशचा खास सीन पाहायला मिळणार आहे. गौरी सध्या जयदीप आणि लक्ष्मीच्या शोधात आहे. गौरीच्या या प्रवासात तिची रितेश देशमुखशी भेट होते. या प्रवासात नेमकं काय काय घडतं? खऱ्या प्रेमाचं महत्त्व रितेश गौरीला कश्या पद्धतीने पटवून देतो? हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल.

 रितेश आणि जिनिलिया देशमुखचा वेड सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. निरपेक्ष प्रेम म्हणजे वेड असतं. याच निरपेक्ष प्रेमाचं महत्व पटवून देणाऱ्या वेड या सिनेमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलियाने स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिका तुझेच मी गीत गात आहे आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये हजेरी लावली.

टॅग्स :वेड चित्रपटजेनेलिया डिसूजारितेश देशमुखस्टार प्रवाह