Join us

अवघ्या दोन महिन्यांतच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:28 IST

'दुर्गा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, या मालिकेमुळे कलर्स मराठी वाहिनीवरील अलिकडेच सुरू झालेल्या मालिकेला मात्र निरोप घ्यावा लागत आहे.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स वाहिनीवरही 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनबरोबरच अनेक नव्या कथा असलेल्या मालिकांचं सरप्राइज चाहत्यांना मिळत आहे. आता 'दुर्गा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, या मालिकेमुळे कलर्स मराठी वाहिनीवरील अलिकडेच सुरू झालेल्या मालिकेला मात्र निरोप घ्यावा लागत आहे. 

कलर्स मराठी वाहिनीवर जून महिन्यात 'अंतरपाट' ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेत रशमी अनपट आणि अशोक ढगे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. गौतमी आणि क्षितीजची जोडी चाहत्यांनाही भावली होती. पण, अवघ्या दोनच महिन्यांत या मालिकेला गाशा गुंडाळावा लागत आहे. 'अंतरपाट' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 

'अंतरपाट' मालिका ही एका कन्नड मालिकेचा रिमेक होती. रेशम टिपणीस, रंजन ताम्हाणे, प्रतीक्षा शिवणकर असे कलाकार मालिकेत होते. १० जूनला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. पण, आता दोन महिन्यांनीच मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. चांगली मालिका लवकर संपत असल्याने प्रेक्षकांनीही या पोस्टवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

'अंतरपाट' मालिकेचं प्रसारण सायंकाळी ७:३० वाजता होत होतं. शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. आता या जागी आजपासून 'दुर्गा' ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.                    

टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता