'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे. या मालिकेनंतर सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने जानकीची भूमिका साकारली आहे. रेश्मा शिंदे हिने २९ नोव्हेंबरला बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे. तो साउथ इंडियन असून त्या दोघांचं लग्न महाराष्ट्रीयन आणि साउथ पद्धतीने झाले. तो काय करतो, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहे. तो सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रेश्मा शिंदेने पवनबद्दल सांगितले. ती म्हणाली की, पवन आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. तो गेल्या ७-८ वर्षांपासून युकेमध्ये काम करत होता. मात्र आता त्याने माझ्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कामाचे स्वरुप पाहता मला परदेशात राहणे शक्य नव्हते. अभिनय जेव्हा करिअर म्हणून करतो तेव्हा हा प्रवास खूपच अनिश्चित असतो. त्यामुळे इथे जास्त संधी उपलब्ध होतील, असे मला वाटले. तसेच मी नवीन ज्वेलरीचा व्यवसायदेखील सुरू केलाय. या सर्व गोष्टींचा विचार करून त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर रेश्माचं सासरी झालं होतं जंगी स्वागत
रेश्मा शिंदेने पवनसोबत आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने सात फेरे घेतले आणि नंतर तिने दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले. लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नानंतर ती सासरी म्हणजे बंगळुरूला गेली होती. तिथे तिने तिचे घर आणि सासरच्यांनी तिचे कसे स्वागत केले, याचा व्हिडीओ शेअर केला होता. आता लग्नानंतर पुन्हा ती शूटिंगसाठी दाखल झाली आहे.