Join us

Pulwama Attack: नेटीझन्स कपिल शर्मावर भडकले, सिद्धूसोबत काम करणं बंद कर अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 18:13 IST

कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिल्याचे पाहायला मिळतंय.

आपण कितीही प्रगती केली... कितीही नवनवी शिखरं गाठली... तरीसुद्धा या भारतमातेसाठी बलिदान देणा-या वीरपुत्रांचे पांग फेडू शकत नाही.. आजही नापाक हल्ल्यात भारताचे सुपुत्र शहीद होतायत. काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सेलिब्रेटी मंडळींनीही हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली असून, दुसरीकडे आता नेटीझन्सने कपिल शर्मावर निशाणा साधला आहे.

‘दहशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा’ अशी मवाळ भाषा वापरत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे.

त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिल्याचे पाहायला मिळतंय. यावर कपिल आणि शोच्या टीमकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाकपिल शर्मा नवज्योतसिंग सिद्धू