'प्रेमाची गोष्ट' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून मुक्ताच्या भूमिकेत आता स्वरदा ठिगळे दिसणार आहे. या नव्या मुक्तासाठी मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने खास पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वा आणि स्वरदाने याआधीही मालिकेत एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा स्वरदासोबत काम करण्यासाठी अपूर्वा उत्सुक आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, "स्वरदा ठिगळेसोबत काम करायला नेहमीच मजा येते. आम्ही या आधीही एकत्र काम केलं आहे. तो अनुभव खूप छान होता. तिचं टॅलेंट, वक्तशीरपणा आणि एनर्जी यामुळे सेटवरील प्रत्येक क्षण स्पेशल होतो. आता आम्ही पुन्हा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहोत. तिच्यामुळे या मालिकेला नक्कीच स्पेशल काहीतरी मिळेल. हा प्रवास सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे".
दरम्यान, नुकतंच 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नव्या मुक्ताची एन्ट्री झाली आहे. मात्र तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत. तेजश्रीला पुन्हा मालिकेत आणण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. आता मुक्ताची भूमिका साकारून स्वरदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होते का, हे पाहावं लागेल.