Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ती घटना मी अजूनही विसरू शकत नाही", हर्षद अतकरीने सांगितला मन हेलावून टाकणारा प्रसंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 15:48 IST

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनेता हर्षद अतकरीने मराठी मालिका विश्वात स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं.

Harshad Atkari : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनेता हर्षद अतकरीने मराठी मालिका विश्वात स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत त्याने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. या मालिकेत हर्षदने शुभम नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. आजही त्याला प्रेक्षक शुभम या नावाने ओळखतात.  त्यानंतर स्टार प्रवाहवरील 'कुन्या राज्याची गं तू राणी' या मालिकेत हर्षदने साकारलेली एका पत्रकाराची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. 

अलिकडेच हर्षदने 'CocktailStudio'ला दिलेल्या मुलाखतीत 'दुर्वा' मालिकेच्या सेटवर त्याच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगावर भाष्य केलं आहे. 

'दुर्वा'  मालिकेच्या सेटवरील एक किस्सा सांगत अभिनेता म्हणतो, " या मालिकेच्या सेटवर आम्हाला सगळेजण पाहून एकत्र जमा झाले. दूर्वा-केशवला पाहून फोटो काढण्यासाठी चाहते पुढे आले. त्याच ठिकाणी एक फॅमिली देखील आली होती. एक मोठी फॅमिली होती. त्यांच्यामध्ये एक काकी होत्या. तेव्हा सगळेच फोटो काढत होते. तेव्हा त्या काकी माझ्या बाजुला फोटो काढायला उभ्या राहिल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, 'माझा मुलगा सेम तुझ्यासारखा होता'. ते मी असं ऐकलं की, 'माझा मुलगा सेम तुझ्यासारखा आहे'. पण तेव्हा मी म्हणालो, अहो! मी देखील तुमच्या मुलासारखा आहे. त्याचक्षणी त्यांना चक्कर आली. मला असं झालं होतं की मी काय करू. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. कसं असतं सहजपणे आपण एखादी गोष्ट बोलून जातो. तेव्हा मी त्यांना मला तुमच्या मुलाप्रमाणे समजा असं म्हणालो. पण त्यावेळेस पहिल्यांदा मी असं का बोललो? असं वाटू लागलं. त्यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील एकाने सांगितलं की 'दुर्वा' मालिकेत माझी जी मिशी होती नाकाची ठेवण त्यांच्या मुलासारखी होती जो या जगात नाही". 

पुढे हर्षद म्हणाला, "अशा परिस्थितीत मला शूटिंग वाईंड -अप करून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. मला पाहून त्या काकी तिथेच बेशुद्ध अवस्थेत होत्या. पण मला असं झालं की त्यांना शुद्ध कधी येते. शुटिंग करताना माझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे होतं. मी या इंडस्ट्रीत नवीन होतो. त्यामुळे अशा घटनेमुळे मी पुरता हलला होतो. यापूर्वी माझ्यासोबत तसं काही घडलं नव्हतं".

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार