कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता एका अत्यंत भावनिक आणि नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. पुढील भागात एका धक्कादायक कटाचा खुलासा होणार आहे. "जगदंबा" हीच मोह आणि क्रोधची हरवलेली मुलगी आहे का? मोहिनी जगदंबालाच आपली हरवलेली मुलगी म्हणून गावकऱ्यांना सांगते आणि या कथेतले नवे नाट्य उलगडू लागते.
तुळजाचे मानवी बालरूप जगदंबाच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना मोहाच्या जाळ्यात अडकवून जगदंबाला महिषासुरासमोर हजर करण्याची कपटी योजना मोहिनीने आखली आहे. तेव्हा मोहिनीची मोहरुपी माया अडकवेल का जगदंबाला तिच्या जाळ्यात याचंही उत्तर मिळणार आहे.
भिंगार गावात एक अनोखा गोंधळ उडणार आहे, जेव्हा भिल्ल वेशातील एक महिला मोहिनी (मोहरुपी माया) आणि तिचा नवरा म्हणजे इंगळोजी (क्रोध) नाट्यमयरित्या प्रवेश करतात. मोहिनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत असते. “वाचवा! वाचवा! ह्यो माणूस माझा जीव घेईल...”क्रोध तिच्यावर आरोप करतो की तिच्यामुळे त्यांची मुलगी हरवली आणि तिचा जीव घेण्याचा इशाराही देतो. मोहिनी मात्र गावकऱ्यांपुढे गयावया करून सांगते की तिने कोणतीही चूक जाणूनबुजून केलेली नाही.
ती गावात एक परडी हरवल्याचे सांगते आणि रडत्या स्वरात विचारते “कुणी पाहिली का हो ती परडी? माझ्या काळजाचा तुकडा त्यात होता...” ही सगळी धावपळ आणि अश्रूंनी भरलेली याचना बघून गावकरी हादरतात. याच वेळी, सुंदराला काहीतरी आठवते. तिला स्मरते, की काही काळापूर्वी तिची भेट मायाशी झाली होती जिने तिला सांगितलं होतं की तिच्या बहिणीची एक परडी या गावात राहिली असून त्यात एक मौल्यवान गोष्ट आहे.
हे आठवताच क्षणी सुंदरा म्हणते, “मी पाहिली आहे ती परडी...!”सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावतात. मोहिनी धावत सुंदरापाशी येते, तिला विचारते – “माझी लेक कुठाय...?” आणि मग सुंदरा एका दिशेने बोट दाखवते. तिकडे उभी आहे जगदंबा.“परडीमध्ये सापडलेली आणि गावात बाहेरून आलेली एकच पोरगी हाय हितं... जगदंबा! हीच तुमची पोरगी हाय...!”. या धक्कादायक वळणानंतर पुढे मालिकेत काय घडणार ? जाणून घेण्यासाठी ‘आई तुळजाभवानी’ मालिका १८ जुलै, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर बघायला मिळेल.