Join us

नेहा कक्कडने द कपिल शर्मा शोमध्ये दिल्या संघर्ष काळातील आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 07:15 IST

नेहाने द कपिल शर्मा शो मध्ये आपल्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले

ठळक मुद्देनेहाने सांगितले की, “मी लहान असताना आम्ही ऋषिकेशला राहायचो. आम्ही जागरणासाठी एकाच स्कूटरवर पाच जण (मी, सोनू दी, टोनी, आई आणि बाबा) जायचो.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात, द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय पार्श्वगायिका नेहा कक्कड तिचे बहीण-भाऊ सोनू कक्कड आणि टोनी कक्कडसोबत येणार आहे. 

हे तिघेही या कार्यक्रमात धमाल मस्ती करत आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देणार आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यातील काही रोचक किस्से देखील सांगणार आहेत. सध्या नेहा तिच्या म्युझिक अल्बम्समुळे चर्चेत आहे आणि इंडियन आयडॉलच्या ११ व्या सत्रात ती परीक्षकाची भूमिका बजावत आहे. 

मनमोकळ्या गप्पा मारताना नेहाने आपल्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले. ती दिल्लीतील कुडकुडत्या थंडीत सोनू आणि टोनीसोबत रात्री उशिरापर्यंत देवीच्या जागरणासाठी जात असे. या आठवणीविषयी नेहाने सांगितले की, “मी लहान असताना आम्ही ऋषिकेशला राहायचो. आम्ही जागरणासाठी एकाच स्कूटरवर पाच जण (मी, सोनू दी, टोनी, आई आणि बाबा) जायचो. काही वर्षांनी आम्ही मारुती व्हॅन घेतली. देवीच्या जागरणाच्यावेळी थोडा वेळ देखील झोपायला मिळायचे नाही. म्हणून आम्ही गाडीच्या मागच्या सीटवर झोपून जायचो.”

कपिलने नेहा, सोनू आणि टोनीबद्दल काही भन्नाट अफवा सांगत गप्पांचे सत्र पुढे सुरू ठेवले. कपिलने नेहाची टर उडवत सध्या तिची शूजची साईझ किती आहे असे विचारले असता नेहा म्हणाली, “माझी US शूज साईझ जवळपास 2.5” आहे.” त्या गप्पांच्या मध्येच टोनीने टिप्पणी केली, “नेहा लहान मुलांच्या शूजच्या दुकानातून सुद्धा आपले शूज खरेदी करू शकते.” 

टॅग्स :नेहा कक्करइंडियन आयडॉल