Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा कक्करही 'गुलाबी साडी'च्या प्रेमात! संजू राठोडबरोबर केला डान्स, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:54 IST

नेहा कक्करला गुलाबी साडीची भुरळ, संजू राठोडबरोबर केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर फक्त एकाच गाण्याची हवा आहे आणि ते म्हणजे 'गुलाबी साडी'. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर हे गाणं ट्रेंडिंग आहे. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. अगदी माधुरी दीक्षितपासून ते परदेशी कलाकारांनीही या गाण्यावर रील बनवले आहेत. आता सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर 'गुलाबी साडी'च्या प्रेमात पडली आहे. 

'गुलाबी साडी' गाणं गाऊन संजू राठोड प्रसिद्धीझोतात आला. त्याचं हे गाणं आज कित्येकांच्या ओठावर आहे. पार्टीपासून ते अगदी लग्नाच्या वरातीपर्यंत सगळीकडे 'गुलाबी साडी' गाणंच वाजताना दिसत आहे. या गाण्याने अक्षरश: वेड लावलं आहे. आत्तापर्यंत या गाण्यावर हजारो रील्स बनवले गेले आहेत. पण, तरीही या गाण्याची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर मराठी अवॉर्ड शोमध्ये 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडने हजेरी लावली होती. त्यानंतर आता 'सुपरस्टार सिंगर ३' या शोमध्ये त्याने उपस्थिती दर्शविली. 

'सुपरस्टार सिंगर ३' शोमधील स्पर्धक आणि परीक्षक गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसले. तर नेहा कक्करने संजू राठोडबरोबर खास रील व्हिडिओ बनवला आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती संजू राठोडबरोबर गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेहा म्हणते, "सध्या माझं फेव्हरेट असलेलं गुलाबी साडी हे गाणं ज्याने लिहिलं आणि गायलं त्या संजू राठोडला भेटले. तुला देवाचे आशीर्वाद मिळो. थँक्यू सुपरस्टार सिंगर ३". 

नेहाच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेहाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर संजूने कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. 

टॅग्स :नेहा कक्करसेलिब्रिटी