सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवण्याचं पेव फुटलं आहे. अलिकडेच दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर मोहन जोशींनी स्वत: समोर येत ते एकदम उत्तम असून ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाने निधन झालं. प्रियाच्या निधनाने सिनेसृष्टी आणि चाहते हळहळले. प्रियाच्या निधनानंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचं निधन झाल्याची खोटी बातमी एका युट्यूब चॅनेलने दिली. या व्हिडीओच्या थंबनेलवर प्रियासोबत त्या मराठी अभिनेत्याचा फोटो लावण्यात आला होता. "प्रिया मराठेनंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचं निधन. मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", असं म्हणत अभिनेता अभिजीत चव्हाणबाबत खोटी बातमी पसरवण्यात आली.
हे पाहून अभिजीतने संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवरुन त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. "माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली...अजून काय पाहिजे.... आता काय करायचं ह्यांचं?", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याच्या पोस्टनंतर युट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. परंतु, वारंवार सेलिब्रिटींच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरणं ही खेदजनक बाब आहे.
दरम्यान, अभिजीत चव्हाणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. स्ट्रगलर साला ही त्याची वेबसीरिज प्रचंड गाजली. सध्या तो मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.