सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाचा सामना करत होती. पण, अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आणि ३१ ऑगस्ट(रविवारी) रोजी तिचं निधन झालं. प्रिया मराठेच्या निधनाने सिनेसृष्टी आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. तिच्या निधनानंतर अनेकांनी पोस्ट शेअर करत प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. आता अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने प्रियाबद्दल लोकमत फिल्मीशी बोलताना भावना व्यक्त केल्या. जिवलग मैत्रिणीबद्दल बोलताना मृणाल भावुक झाली.
मृणाल म्हणाली, "वेडे हा शब्द तिनेच दिलेला आहे. आम्ही एकमेकींना कधी नावाने आवाजच दिला नाही. आम्ही एकमेंकीना वेडेच म्हणायचो. प्रिया इतकी मोठी लढाई लढतेय हे पण आम्हाला फार उशीरा कळलं. तिने हे पटकन बाहेर येऊ दिलं नाही. ती एकटीच सगळं सहन करत राहिली. काही दिवसांपूर्वीपर्यंत आम्ही बोलत होतो. कुठल्याही गोष्टीत प्रियाचं नाव निघायचं. असं कधीच झालं नाही की आम्ही तिला विसरलो. कारण ती खूप खास होती. आज मोबाईल उघडला तरी सगळीकडे प्रिया दिसतेय याचं तेच कारण आहे की ती खरंच तितकी गोड होती. गोड दिसणारी, सुंदर पर्सनालिटी आणि उत्तम अभिनेत्री. फारच वाईट घडलं याचं आम्हालाही खूप वाईट वाटतंय".
"मी अमेरिकेत असतानाही तिचा मला फोन आला होता की मी आलीये मला भेट. काही कारणामुळे आमची चुकामूक झाली. आमचं भेटणच झालं नाही. ऐनवेळी प्रियाचा फोन बंद झाला. कुठे भेटायचं हा पत्ताच आमचा शेअर झाला नाही. आणि ती अमेरिकेतून निघून गेली. मी तिला कॉल करत राहिले आणि तिचे फोनच लागले नाहीत. मग जेव्हा ती भारतात आली तेव्हा ती माझ्यावर खूप चिडली होती. आमचं तेव्हापासून भेटणं राहिलं होतं. आम्ही शेवटपर्यंत भेटलोच नाही", असंही पुढे मृणाल म्हणाली.