Swanandi Tikekar: 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या स्वानंदीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेसह अभिनेत्रीने झी मराठीच्या 'अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई' मालिकेतही काम केलं आहे. स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकीलकर यांची मुलगी आहे. सध्या स्वानंदी एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये तिने अभिनय क्षेत्रात येण्याचा तिचा निर्णय आणि कठीण काळावर भाष्य केलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्वानंदी टिकेकरने तिच्या प्रवासाविषयी भाष्य केलं.त्यादरम्यान, स्वानंदीला अॅक्टिंग करते त्या निर्णयाबद्दल घरच्याचं काय मत होतं. असा प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना स्वानंदी टिकेकर म्हणाली," मला त्यांचा कायम पाठिंबा होता. माझ्या आई-बाबांनी मला दोघांनी बसून एक गोष्ट समजावली ते म्हणाले - हे बघ तू तिकडे जाणार, पैसे खर्च करणार त्यासाठी मोठं लोन घ्यावं लागणार आणि त्याची परतफेड देखील करावी लागणार आहे. तुला हवं असेल तर आम्ही सगळं करु. पण, आम्ही कलाकार आहोत. तुझ्यात सुद्धा एक कलाकार आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचं काम लोकांना आनंद देणं, स्वत: ला आपल्या कामातून आनंद मिळणं. ही फार मोठी गोष्ट आहे. तर हे सगळं तुला शक्य असेल तर तुला ते सोडून दुसरं काही करायचं आहे का याबद्दल तू विचार कर."
पुढे ती म्हणाली, "मग मी यावर विचार केला. तेव्हाच मला एका नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर मला असं वाटलं की आपली आवड हेच आपलं प्रोफेशनल असण्याचा भाग असणं हा जो आनंद आहे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण हे सोडता कामा नये. "
स्ट्रगलविषयी स्वानंदी म्हणाली...
यानंतर स्वानंदी टिकेकरने म्हटलं की, "अनेकजण मला जेव्हा म्हणतात की आम्हाला ती गोष्ट करायची होती. पण जबाबदारीमुळे ते जमलं नाही, आणि हे खरं आहे. माझ्या आयुष्यात असे अनेक महिने आलेले आहेत जेव्हा माझ्या हातात कामच नव्हतं. मी एकदा काहीतरी काम केलंय त्यातली जी सेव्हिंग होती त्याच्यावर माझे सहा महिने चाललेत.ही सोपी गोष्ट नाही आहे. बरं, लोकांना असं वाटतं की कलाकार आहेत म्हणजे यांच्याकडे खूप पैसे आहेत. माझे आई-वडील दोघेही मराठी कलाकार असून आमचं एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्यामुळे कष्ट केल्याशिवाय पैसे कोणालाच मिळणार नाही.त्यासाठी कष्टाला पर्याय नाही. शिवाय या क्षेत्रात काम करताना लोकांकडून तुम्हाला इतकं प्रेम मिळतं, प्रसिद्धी मिळते आणि आशीर्वाद मिळतात. त्यामुळे या क्षेत्रात येणं दैवी देणगीच आहे. पण सोप्पंही नाही कारण आर्थिक स्थैर्य नाही." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.