Join us

हातातून काम गेलं, डिप्रेशन आलं अन्...; अभिनेत्री अक्षया हिंदळकरने सांगितला 'तो' वाईट प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:36 IST

अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Akshaya Hindalkar: अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या अक्षया झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत वसुंधराच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील वसुंधरा व आकाशची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. दरम्यान, अलिकडेच अक्षयाने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अपघाताचा किस्सा शेअर केला आहे. 

अलिकडेच अक्षया हिंदळकरने 'कलाकट्टा'ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अपघाताविषयीचा सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली,"पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेपूर्वी मी एक मराठी मालिका केली.  त्याच्यानंतर हिंदीमध्ये काम करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. खूप ऑडिशन्सही दिल्या. त्यानंतर एक हिंदी ऑडिशन मी क्रॅक केलं आणि मी फायनल झाले. माझं असं झालं की मी एक मराठी मुलगी हिंदीमध्ये काम करणार होते, त्यामुळे घरी सुद्धा सगळे खुश झाले. आमच्या मालिकेचा मुहूर्त होता त्यादिवशी मी साडी नेसणार होते. त्यासाठी दोन-तीन दिवसआधी मी ब्लाऊज शिवायला दिला होता. तो शिवलेला ब्लाऊज आणण्यासाठी मी स्कुटीवरुन गेले. तिकडे जात असताना मध्ये मोठा एक सिग्नल होता तिथे एक काका सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडत होते. ते काका रस्ता क्रॉस करताना मी स्पीडमध्ये होते. त्यांना वाचवायला गेले आणि माझा अपघात झाला. त्यामुळे माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ती हिंदी मालिका माझ्या हातातून गेली."

पुढे अक्षया म्हणाली, "त्या अपघातानंतर मी दीड वर्ष चालू शकत नव्हते. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की, तिला चालायचा थोडा वेळ लागेल. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले, कारण हातातून काम गेलं होतं. त्यादरम्यान खूप गोष्टी कळल्या. स्वत: बद्दल आपल्या माणसांबद्दल सगळ्याच गोष्टी समजल्या. मला वाटतं की त्या अपघाताने मला खूप काही शिकवलंय. आता मी जी काही आहे हा त्या अपघाताचा परिणाम आहे. मी खूप सकारात्मक विचार करते आणि खूप आनंदात आहे. मला असं वाटतं जगातील कुठलीही गोष्ट असू दे किंवा काहीही असेल, जे चांगलं होणार आहे ते जाणार आहे. आणि जे वाईट घडतंय आयुष्यात ते ही एकदिवस जाणार आहे." अशा भावना अक्षयाने व्यक्त केल्या.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी