Girija Prabhu New Serial: छोट्या पडद्याची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यात येतात. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर अलिकडच्या काळामध्ये बऱ्याच नव्या मालिका सुरु करण्यात आल्या. अगदी काल रविवारी स्टार प्रवाह परिवार २०२५ चा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यात आता टीआरपीमध्ये मोठी झेप घेण्यासाठी वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केल्याची पाहायला मिळते. नुकतीच सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी आगामी मालिकेचा प्रोमो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्या गेलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय की, "येतेय कोकणची कावेरी, जणू बाळाची दुसरी आईच..., नवी मालिका, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ लवकरच स्टार प्रवाहवर...", त्यामुळे प्रेक्षक देखील सुखावले आहेत. 'लग्नानंतर होईलच प्रेम' तसंच 'तू ही रे माझा मितवा' या मालिकांनंतर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू... विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय चेहरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रेक्षकांची लाडकी गौरी अर्थात गिरीजा प्रभू आहे. नव्या मालिकेतून गिरीजाने दमदार कमबॅक केलं आहे.
अलिकडेच डिसेंबर महिन्यात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. जवळपास ४ वर्षे या मालिकेने रसिकांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी मालिकेमध्ये जयदीप-गौरीची मुख्य भूमिका साकारली होती. जयदीप-गौरी या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर आता गिरीजा एका आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोण होतीस तू काय झालीस तू मध्ये कावेरी नावाची भूमिका ती साकारणार आहे. त्यामुळे गिरिजाचे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दरम्यान, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेतग गिरीजा प्रभूसह अभिनेते वैभव मांगले तसेच 'लग्नाची बेडी' फेम अमृता माळवदकर आणि अमित खेडेकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.