Rishi Saxena: 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शिवकुमार म्हणजेच अभिनेता ऋषी सक्सेना चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली. २०१६ साली प्रसारित झालेल्या या मालिकेने लोकप्रियतेचा शिखर गाठलं होतं. दरम्यान ऋषीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. ऋषी आणि अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबद्दल त्याने भाष्य केलं आहे.
नुकतीच अभिनेता ऋषी सक्सेनाने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींवर दिलखुलापणे गप्पा मारल्या. त्यादरम्यान,कलाकारांबद्दल होणाऱ्या नकारात्मक चर्चांबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला," तुमच्याबद्दल जर नकारात्मक बातम्या येत नसतील तर याचा अर्थ लोक तुमच्याबद्दल काही बोलत नसावेत. मला असं वाटतं, जर लोकं तुमच्या बाबतीत खूप विचार करत असतील किंवा बोलत असतील तेव्हा निगेटिव्ह कमेंट्स केल्या जातात."
पुढे ट्रोलिंगबद्दल ऋषी म्हणाला, "जेव्हा मी आणि ईशाने सुरुवातीला एक फोटो पोस्ट केला होता की आम्ही एकत्र आहोत, तेव्हा खूप ट्रोलिंग झाली होती. मला तर लोकं ट्रोल करत होतेच पण ईशाला सुद्धा खूप ट्रोल करण्यात आलं. याचं कारण म्हणजे मी एक अमराठी आहे. त्यानंतर असं काहीच आमच्यासोबत घडलं नाही."असा खुलासा अभिनेत्याने केला.
अशी सुरु झाली लव्हस्टोरी!
ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. २०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर ईशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एक दिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली.
वर्कफ्रंट
मालिकांबरोबरच ऋषी सक्सेनाने सिनेमात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘रेनबो’ या चित्रपटांतून ऋषी मोठ्या पडद्यावर झळकला.