Harshad Atkari: अभिनेता हर्षद अतकरी (Harshad Atkari) हे नाव प्रेक्षकांना काही नवं नाही. छोट्या पडद्यावरील 'फुलाला सुगंध मातीचा', 'कुन्या राजाची तू गं राणी' तसेच 'दुर्वा' यांसारख्या मालिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्याने फुलाला सुगंध मातीचा मालिकेत साकारलेला शुभम प्रेक्षकांना भावला. परंतु, या अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. एका मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केलं होतं.
आईचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाल्याने अभिनेत्यावर दु: खाचा डोंगर कोसळला. त्या कठीण काळावर हर्षदने 'राजश्री मराठी' दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. त्या दरम्यान अभिनेता म्हणाला, "खरंतर, मी जवळपास वर्षभर याबद्दल कुठेही बोलला नाही. माझं असं आहे की, पर्सनल लाई इज पर्सनल. त्या गोष्टी कुठेही प्रोफेशनमध्ये आणत नाही. पण, कुठून ना कुठून त्या गोष्टी बाहेर येतात. जेव्हा फुलाला सुगंध मातीचा मालिका सुरु होती तेव्हा आई गेली. तिला कॅन्सर होता. हे पण खूप कमी लोकांना माहिती आहे. दोन वर्षांपासून ती या आजारपणाचा सामना करत होती आणि त्यानंतर अचानक बाबा गेले. हे सगळं अचानक घडलं ज्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती."
त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हटलं, "पण, मला बहीण आहे माझं असं आहे की Why Me मी म्हणून फायदा नाहीये. जे व्हायचं होतं ते नाहीच व्हायला पाहिजे होतं. दोन्ही गोष्टी खूपच लवकर झाल्या. मी त्याची कल्पना देखील केली नव्हती. मला आठवतंय जेव्हा आई होती, तेव्हा मी या सिनेमाचं शूटिंग केलं आहे आणि तेव्हा तिची तब्येत बरी होती. जेव्हा जेव्हा तिला बरं होतं, तेव्हा मी या सिनेमाचं शूट केलंय. त्या झोनमध्ये मी सिनेमापण शूट केलाय. तेव्हा मी नेहमी तिला सांगायचो की, बघ माझी फिल्म येणार आहे. त्यामुळे ती असती तर बरं झालं असतं, तिने माझं काम पाहिलं असतं. तर ते सगळं मिस झालं आणि हा रिग्रेट माझ्या मनात कायम असणार आहे." असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.