Anuj Prabu: छोट्या पडद्यावरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. ही मालिका चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत असते. या मालिकेतील भावना, सिद्धू, जान्हवी तसेच जयंत, लक्ष्मी, श्रीनिवास आणि विश्वा या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. मालिकेमध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर तसेच तुषार दळवी, अक्षया देवधर यांच्यासह दिव्या पुगावकर, निखिल राजेशिर्के आणि मिनाक्षी राठोड अशी तगडी स्टारकास्ट आहे. दरम्यान, मालिकेत विश्वा हे पात्र अभिनेता अनुज प्रभूने साकारलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने खास किस्सा शेअर केला आहे. जान्हवीने लग्न केल्यामुळे प्रेमभंगात विश्वा नशेच्या आहारी जातो. मालिकेचा तो भाग बघून एका चाहतीने सर्वांसमोर अभिनेत्याला प्रश्न विचारला होता.
अलिकडेच अभिनेता अनुज प्रभूने 'स्टार मीडिया मराठी' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, अभिनेत्याने मच्छी मार्केटमधील एक किस्सा सांगितला. याबद्दल बोलताना अनुज म्हणाला, "एक किस्सा सांगायचं तर मी मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथे मला ज्या कोळीणबाई होत्या त्यांनी मला ओळखलं. तेव्हा लक्ष्मी निवास मालिकेत तो ट्रॅक चालू होता जेव्हा दारु पिऊन मी रडत होतो. त्यावेळी सगळे मला म्हणायला लागले अरे! तू किती दारु पितोस? किती रडतोस? एका कोळीणबाईंनी तर मला पापलेट फ्री दिला. मला तेव्हा खूप भारी वाटलं. मी फिश लव्हर, मासे खातो, त्यामुळे हे सगळं बघून खूप भारी वाटलं. त्या कोळीणबाई मला म्हणाल्या, मला तुझं काम खूप आवडतं. तू रडतोस तर मला रडायला येतं. यामुळे मी मालिकेचे आभार मानतो." असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांची खास आठवण शेअर केली.
वर्कफ्रंट
अनुज प्रभूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर याआधी तो 'लोकमान्य' या मालिकेत झळकला आहे. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटात देखील त्याने काम केलं आहे.