'अधुरी एक कहाणी', 'काटा रुते कुणाला' या मराठी मालिकांमध्ये दिसलेली स्नेहा वाघ (Sneha Wagh) आठवतेय? काही मराठी मालिका केल्यानंतर ती हिंदीत गेली. गेल्याच वर्षी तिची 'नीरजा' ही मालिका संपली. त्याआधी तिने अनेक हिंदी मालिका केल्या. मात्र आता स्नेहा वृंदावनात रमली आहे. श्रीकृष्णाच्या भक्तीत ती तल्लीन झाली आहे. त्यामुळे ती केवळ कामासाठीच मुंबईत येते. एरवी ती वृंदावनातच स्थायिक झाली आहे. पुन्हा मराठी मालिकेत काम करणार का? असं विचारलं असता तिने काय उत्तर दिलं वाचा.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्नेहा वाघ म्हणाली, "मराठी मालिका मी आता नाही करु शकत. आता माझी भाषा थोडी बदलली आहे. जेव्हा मी हिंदीत काम सुरु केलं तेव्हा सुरुवातीला मला दिग्दर्शकाने छडीने मारलं होतं. कारण माझे उच्चार थोडे भलतेच येत होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण ज्या भाषेत मनात विचार करतो ती भाषा तुमची चांगली होते. तेव्हा माझ्यात बदल झाला. मध्ये मी फिल्ममेकिंगसाठी लंडनलाही गेले होते. त्यामुळे तेही विश्व मी बघितलं. आता वृंदावनात राहून ब्रज भाषा यायला लागली आहे. त्यामुळे आता पुन्हा मराठीत काम करणं शक्य नाही."
ती पुढे म्हणाली, "मला टीव्हीवर पुन्हा काम करायला आवडेल. पण काय चालतंय काय नाही चालत आहे हे मी ओळखायचा प्रयत्न करत आहे. ओटीटीही आता आलं आहे. आता तर टीव्ही मोबाईलवर आला आहे. त्यामुळे सगळं आत्मसात करणं अवघड जात आहे. ते सेट झालं की कामही आपोआप सुरु होईल. सध्या मी वृंदावनातच म्युझिक अल्बम शूट करत आहे. दिग्दर्शनही करत आहे."