Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्रीचं ७ वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन; म्हणाली, "छातीत धडधड, पोटात गोळा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:45 IST

मालिकेचा प्रोमो आणि तिचा लूकही समोर आला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

'स्टार प्रवाह'वर अनेक नव्या मालिका येत आहेत. त्यातलीच एक 'वचन दिले तू मला'. या मालिकेतून एक अभिनेत्री अनेक वर्षांनी पुनरागमन करत आहे. नुकतंच तिने 'अ परेफक्ट मर्डर' नाटकातून रंगभूमीवरही कमबॅक केलं. तर आता ती टेलिव्हिजनवरही दिसणार आहे. मालिकेचा प्रोमो आणि तिचा लूकही समोर आला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे श्वेता पेंडसे. तिने स्टार प्रवाहवरील 'जयोस्तुते','लक्ष्य','अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकांमध्ये काम केलं होतं. आता ती ७ वर्षांनंतर 'वचन दिले तू मला'  मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 पोस्ट करत तिने लिहिले, "पोटात 10 किलोचा गोळा...छातीत धडधड.. आणि तरीही प्रचंड आनंद आणि विलक्षण उत्साह जाणवतोय. 7 वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेत अभिनय करतेय. म्हणतात ना.. Best things happen when they are least expected.. अगदी तसंच झालं. बरेच दिवसांपासून एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि मनीमानशी नसताना अक्षरशः एका दिवसात हे सगळं जुळून आलं. पहिल्या दिवशी सेटवर गेले तेव्हा माझाच विश्वास बसत नव्हता की मी पुन्हा एकदा शूट करतेय. माझा अभिनेत्री म्हणून मालिका विश्वातला प्रवास स्टार प्रवाह वाहिनीच्या ' लक्ष्य ' मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर याच वाहिनीवर ' जयोस्तुते ' ही मालिका केली. नंतर सेवंथ सेन्स मीडिया बरोबर केलेली ' अस्स सासर सुरेख बाई ' ही मालिका खूप गाजली. यातल्या ' विभावरी इनामदार' या भूमिकेने मला मालिकाविश्वात खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. 

आता हा नवीन प्रवास पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि सेवंथ सेन्स मीडिया बरोबरच सुरू होतो आहे हा विलक्षण योगायोग! ' वचन दिले तू मला ' या मालिकेत ' पूर्वा शिंदे' ही भूमिका करायची संधी मिळाली आहे. ही अत्यंत गोड व्यक्तिरेखा आहे. मला ऐकताक्षणी ही भूमिका फार भावली कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. माझ्यासाठी ही भूमिका साकारणं खरं तर एक आव्हान आहे..ते का, हे मालिका बघितल्यावर तुम्हाला कळेलच! 

रंगभूमीवर ' 38 कृष्ण व्हीला' नाटकातील ' नंदिनी'.. ' शश sss घाबरायचं नाही' मधली ' निरांजनी ' आणि ' खानावळवाली', '  अ परफेक्ट मर्डर' मधील इन्स्पेक्टर घारगे आणि आता ' वचन दिले तू मला ' मालिकेमध्ये ' पूर्वा शिंदे ' या अत्यंत भिन्न चार व्यक्तिरेखा एकाच वेळेला मला साकारायला मिळतायेत ही एक अभिनेत्री म्हणून किती कित्ती सुखावणारी गोष्ट आहे! 

'मी आता मालिकेत कामच करणार नाहीये' असं सगळ्यांना वाटत असताना या सुंदर व्यक्तिरेखेची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने आणि हक्काने टाकल्याबद्दल सेवंथ सेन्स मीडिया आणि संपूर्ण स्टार प्रवाह टीमचे मी मनापासून आभार मानते. खूप भीती वाटतेय खरंतर...पण मी जीव ओतून काम करेन. तुम्हालाही पूर्व शिंदे, या मालिकेतल्या इतर सगळ्याच व्यक्तिरेखा आणि ही मालिकासुद्धा खूप आवडेल याची आशा नव्हे खात्री आहे. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या." 

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनस्टार प्रवाह