Sayli Salunkhe: मराठी कलाविश्वातील बरेचसे कलाकार हे आता हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपल्याला काम करताना दिसत आहेत. निशिगंधा वाड, किशोरी शहाणे तसंच अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख या अभिनेत्रींनी मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आपलं एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ती अभिनेत्री म्हणजे सायली साळुंखे (Sayli Salunkhe). 'छत्रीवाली','सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकांमुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय ती 'पुकार दिल से दिल तक', 'बातें कुछ अन कहीं सी' या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. परंतु सध्या अभिनेत्री 'वीर हनुमान' या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. 'सोनी सब'वरील या पौराणिक मालिकेत ती माता अंजनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. भगवान हनुमंताची जन्मकथा या मालिकेतून उलगडणार आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री सायली साळुंंखेने माध्यमांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं.
अलिकडेच सायली साळुंखेने दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठीसह हिंदी मालिकाविश्वातील तिच्या काम करण्याच्या अनुभवांविषयी सांगितलं. त्यावेळी अभिनेत्रीला मराठी मालिकांची कधी ऑफर आली का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "माझ्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांमधून झाली. त्या मालिकांमध्ये खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर नशिबाने मला हिंदीत काम मिळालं. पण, एक महाराष्ट्रीयन मुलगी म्हणून मला जर मराठीत काम करायची संधी मिळाली तर मी ती संधी कधीच सोडणार नाही. कधी कधी आपल्याला प्रोफेशनली काही गोष्टींचा विचार करावा लागतो. याशिवाय मी मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलं आहे. माझी एक इच्छा आहे की सगळ्या मीडियममध्ये काम करावं आणि माझा स्वत: ला एक परफॉर्मर बनवायचा प्रयत्न आहे."
मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत काम करताना काय वेगळेपण जाणवलं?
यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "दोन्ही इंडस्ट्रीत वेगळं असं काही नाही. या गोष्टी माणसावर अवलंबून असतात. आपलं मराठी कल्चर आणि हिंदीमधील कल्चर थोडं वेगळं पडतं. इकडे सगळं प्रोफेशनली पाहिलं जातं आणि मराठीमध्ये माणुसकीला जास्त महत्त्व दिलं जातं. बाकी दोन्हीकडे काम करण्याची पद्धत सारखीच आहे." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
वर्कफ्रंट
दरम्यान, अभिनेत्री सायली साळुंखेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वाच्या सुरुवातीला सायली साळुंखे दिसली होती. तिने जयदीपची गर्लफ्रेंड ज्योतिकाची भूमिका साकारली होती.या मालिकेमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.